उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंडन करून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:20 IST2025-03-22T17:53:45+5:302025-03-22T18:20:43+5:30
Ulhasnagar News: जागतिक जल दिनाचे औचित्य साधून प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांनी मुंडन केले.

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मुंडन करून नदीपात्रात बेमुदत आंदोलन सुरु
-मुरलीधर भवार, कल्याण
उल्हास नदी ही बारमाही पाण्याचा मोठा जलस्त्रोत आहे. या नदीला येऊन मिळणारे सांडपाणी आणि रासायनिक पाण्याचे नाले बंद केले जात नाही. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. मात्र नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस उपाययोजना केली जात नाही. आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधत मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी नदी पात्रात बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. प्रशासनाच्या नाककर्तेपणाच्या विरोधात निकम यांच्यासह उमेश बोरगांवकर यांनी मुंडन करुन प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निकम यांच्यासह बोरगांवकर, माजी नगरसेवक कैलास शिंदे याच्या आंदोलनाला श्रीनिवास घाणेकर, शशिकांत दायमा आणि रविंद्र लिंगायत यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. निकम यांनी सांगितले की, उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ते २०१४ सालापासून विविध सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहे. त्यांना केवळ आश्वासने दिली जातात. त्याची पूर्तता केली जात नाही.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. उल्हास नदीला सांडपाण्याचे आणि रासायनिक पाण्याचे नाले येऊन मिळतात. उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण या सगळ्यांची इच्छा आहे. त्यांनी तसे आदेशही प्रशासनाला दिले आहेत.
उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी. त्यासाठी तिचे प्रदूषण रोखले जावे अशी सरकारी यंत्रमांची इच्छाशक्ती नाही. गेल्या आठ वर्षापासून त्यांच्याकडून नदी प्रदूषण दूर करण्याची केवळ आश्वासने दिली जात आहे. सरकारी यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईच्या विरोधात निकम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नदी पात्रात आंदोलन सुरु केले आहे.
२२ मार्चपासून दररोज सकाळी १० ते ५ या वेळेत आंदोलकर्ते नदी पात्रात उभे राहणार आहेत. सायंकाळी पाच ते सकाळी ११ या वेळेत ते नदी किनारी टाकलेल्या मंडपात बसून ढिम्म प्रशासनाचा निषेध व्यक्त करणार आहेत.
यापूर्वी निकम यांनी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी नदीपात्रात रात्रंदिवस उभे राहून जवळपास ३६ दिवस आंदोलन केले आहे. आत्ता तरी प्रशासनाने त्याची दखल घेऊन योग्य तरी कार्यवाही करावी अशी मागणी निकम यांनी केली आहे.