१३ गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्यास मोठ्या जिकरीने केली अटक
By धीरज परब | Published: July 4, 2023 07:22 PM2023-07-04T19:22:17+5:302023-07-04T19:22:35+5:30
चैन व मोबाईल स्नेचिंग सह वाहन चोरीचे १३ गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीतील सराईत आरोपीला गुन्हे शाखेने मोठ्या जिकरीने अटक केली आहे.
मीरारोड - चैन व मोबाईल स्नेचिंग सह वाहन चोरीचे १३ गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीतील सराईत आरोपीला गुन्हे शाखेने मोठ्या जिकरीने अटक केली आहे. त्याच्या कडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे. नालासोपारा च्या आचोळे भागात तसेच वसईच्या वालीव व माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी वरून येऊन आरोपींनी १९ जून रोजी चैन स्नेचिंग चे ३ गुन्हे केले होते. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत तपास पथके आरोपींचा शोध घेत होती.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखे ने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी व माहितीच्या आधारे आरोपीचा आंबिवली पर्यंत माग घेतला. गुन्ह्यातील आरोपी अली हसन अफसर उर्फ अबू जाफरी (२४) रा. पाटील नगर, आंबिवली पश्चिम, कल्याण हा असल्याचे निष्पन्न झाल्यावर झाले. आंबिवलीच्या ईराणी वस्तीमध्ये त्याचा नेमका ठाव ठिकाणा शोधला. स्थानिक पोलीसांच्या मदतीने जाफरी च्या घरावर धाड टाकली असता तो खिडकीतून उडी मारुन लगतच्या जंगलाच्या दिशेने पळून गेला.
सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक व पथकाने पोलीस जंगलाच्या दिशेने पाठलाग केला. जंगलात पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या दिशेने जाफरी चा शोध घेऊ लागले. त्यावेळी हवालदार शिवाजी पाटील यांनी दलदलीत लपलेल्या जाफरीला पकडले. त्यावेळी जाफरीने प्रतिकार करायला सुरुवात केली. पाटील व जाफरी यांच्यात झटापट झाली तरी देखील पाटील यांनी त्याला धरून ठेवले.
अटक केलेल्या जाफरीची कसून चौकशी केली असता त्याने मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ तर गुजरातच्या मेहसाणा व ठाणे शहर हद्दीत कापूरबावडी पोलिस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ असे एकूण ११ गुन्हे केले आहेत. तसेच कल्याण तालुका व शीळ डायघर पोलिस ठाण्यातील २ गुन्ह्यात तो वॉन्टेड होता. चैन स्नॅचिंगचे ७ गुन्हे, मोबाईल स्नॅचिंग चे २ गुन्हे व गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकल चोरीचे २ गुन्हे तपासात उघड झाले आहेत. गुन्हयात चोरलेले सोन्याचे दागिने, २ मोबाईल व २ दुचाकी असा एकूण ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिस हस्तगत केला आहे.