गुजरात वरून येऊन महाराष्ट्रात रिक्षा चालकांना लुटणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक
By धीरज परब | Published: May 21, 2023 07:57 PM2023-05-21T19:57:34+5:302023-05-21T19:57:50+5:30
मीरारोडच्या नया नगर व काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा चालकांना गुंगीकारक औषध देऊन लुटण्याचे ३ गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती.
मीरारोड : गुजरात मधून येऊन मुंबई, ठाणे, मीरारोड मध्ये रिक्षा चालकांना गुंगीकारक औषध देऊन लुटणाऱ्या सराईत त्रिकुटास मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांनी मुंबई, ठाणे, मीरारोड भागात ८ रिक्षा चालकांना लुटल्याचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्या कडून ५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मीरारोडच्या नया नगर व काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा चालकांना गुंगीकारक औषध देऊन लुटण्याचे ३ गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती. आरोपी हे बोरिवली आदी भागातून मीरारोड मधील एकाद्या देवळाचे नाव सांगून दर्शन घेऊन परत यायचे असे सांगायचे. रिक्षा चालकास मीरारोड भागात आल्यावर प्रसादाचा पेढा वा थंडपेय मध्ये गुंगीकारक औषध देऊन त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, रोख आदी लुटून पळून जायचे.
या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे सह संजय पाटील, राजू तांबे, संजय शिंदे, किशोर वाडीले, अविनाश गर्जे, विकास राजपूत, सचिन सावंत, प्रशांत विसपुते, समीर यादव, प्रफुल्ल पाटील, सायबर शाखेचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच अन्य भागातील गुन्ह्यांचा आढावा घेऊन तपास चालवला होता.
पोलिसांनी सुरत येथून सागर महेंद्रभाई पारेख ह्याला आधी पकडले. त्याच्या चौकशीत संपतराज ऊर्फ संपो गेवेरचंद (गेवरचंद) जैन आणि सुभाष अरविंद पाटील दोघे हि रा.अहमदाबाद, गुजरात ह्या आरोपींची माहिती समोर आली. त्यावेळी सदर दोन्ही आरोपी हे मीरारोड मध्येच सावज शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर त्यांना देखील अटक करण्यात आली.
आरोपीं कडून गुन्हे शाखेने ५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींनी मुंबईच्या वांद्रे व आंबोली तसेच ठाण्याच्या खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत देखील असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. तिघेही आरोपी हे रिक्षा चालकांनाच लुटायचे. गळ्यात सोन्याची चैन असलेला रिक्षा चालक हेरायचे. त्याला परतीच्या भाड्याचे आमिष दाखवायचे. गुंगीकारक औषध असलेला प्रसाद, थंडपेय दिल्यावर चालकाची शुद्ध हरपली वा तो अर्धवट शुद्धीत असला तरी त्याच्या चैन सह मोबाईल. रोख वा अन्य अंगावरील दागिने काढून घेत. गुजरात वरून ट्रेन वा बस ने येत. दादर व मीरारोड भागात लॉज मध्ये रहायचे आणि लूटमार करून गुजरातमध्ये पळून जायचे.
अटकेतील संपत जैन हा अट्टल लुटारू असून त्याच्यावर अहमदाबाद, बडोदा सह गुजरात मध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गुजरात मध्ये जैन हा रॅकोर्डवर असल्याने त्याने साथीदारांसह गुजरात लगतच्या महाराष्ट्रातील पश्चिम पट्टा लुटमारीसाठी निवडला होता. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ते अटकेत आले आहेत.