ठाण्यात धावत्या कारवर मेट्रोच्या बांधकामाची लोखंडी सळई कोसळली
By जितेंद्र कालेकर | Published: June 5, 2023 04:57 PM2023-06-05T16:57:44+5:302023-06-05T16:57:57+5:30
तीन हात नाका येथील घटना: सुदैवाने जीवित हानी टळली
ठाणे: तीन हात नाका येथे मेट्रोचे काम सुरू असताना एक लोखंडी सळई धावत्या मोटारकारवर कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीन हात नाका येथे सध्या मेट्रोच्या ब्रिजचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतांना ब्रिजवर काम करणाऱ्या एका कामगाराच्या हातातून लोखंडी सळई सुटली. ही सळई मुलुंड चेकनाक्याकडून तीन हात नाक्याकडे येणाऱ्या एका मोटारकारवर कोसळली.
ठाण्यात मेट्रोचे काम सुरू असताना एक लोखंडी सळई धावत्या मोटार कारवर कोसळल्याची घटना, सुदैवाने चालक बचावला #Thanepic.twitter.com/ptp9EupiqB
— Lokmat (@lokmat) June 5, 2023
त्या दरम्यान, या मोटारीतून चालक जितेंद्र यादव यांच्यासह तिघेजण भांडूप ते कोलशेत असा प्रवास करीत होते. सुदैवाने, या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. वाहतूक पोलीसांच्या मदतीने ही मोटारकार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. या घटनेबाबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मेट्रो विभागाला योग्य त्या सूचना िदल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.