जादूटाेण्याच्या संशयावरून वृद्धाला नेले विस्तवावरून, मुरबाड तालुक्याच्या करवळे गावातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 07:04 AM2024-03-08T07:04:35+5:302024-03-08T07:05:32+5:30
जादूटोणा करतो, असा आराेप करून भावार्थे यांना मंगळवारी पहाटे अडीच वाजता विस्तवावर जबरदस्तीने चालायला भाग पाडले. मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात काथोड भावार्थे, ज्ञानेश्वर भावार्थे, काळूराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसू भावार्थे आणि गावातील तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
ठाणे : जादूटाेणा करताे, असा आराेप करून मुरबाड तालुक्यातील करवळे येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण भावार्थे (६०) यांना विस्तवावरून चालण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचे पाय भाजल्याने त्यांना वेदना हाेत आहेत. त्यांची मुलगी सविता माेरे हिला कल्याण येथील अंधश्रद्ध निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ देऊन पाेलिसांत गुन्हा दाखल केला आहे, असे अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशाेक चव्हाण यांनी सांगितले.
जादूटोणा करतो, असा आराेप करून भावार्थे यांना मंगळवारी पहाटे अडीच वाजता विस्तवावर जबरदस्तीने चालायला भाग पाडले. मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलिस ठाण्यात काथोड भावार्थे, ज्ञानेश्वर भावार्थे, काळूराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसू भावार्थे आणि गावातील तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास मुरबाडचे पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर करत आहेत.
या घटनेचा व्हिडीओ अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांच्याकडे आला. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे अंनिसच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्याकडे तक्रार पाठवली. शिंदे यांनी पीडित वृद्धाच्या विधवा मुलीशी संपर्क साधून तिला धीर दिला.
मोलमजुरी करून उदरनिर्वाह
- लक्ष्मण भावार्थे हे आपली विधवा मुलगी सविता आणि नातू सागर यांच्यासह राहतात. ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.
- त्यांचे शेजारी काथोड भावार्थे हे त्यांच्याविषयी गावात सतत जादूटोणा करतात असा प्रचार करत असल्यामुळे ग्रामस्थ कुटुंबाला टोमणे मारत होते, असे तक्रारीत नमूद केले आहे.
- दरम्यान, आसनगाव येथील देवा म्हसकर या मांत्रिकावरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
संपूर्ण गाव विरोधात, मुलीने केली तक्रार
- संपूर्ण गाव विरोधात असल्यामुळे ती तक्रार द्यायला धजावत नव्हती. परंतु शिंदे यांनी तिला आधार देऊन पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले.
- तसेच मुरबाड पोलिस ठाण्यात फोन करून या घटनेबाबत तक्रार नोंद करून घ्यावी, अशी विनंती केली. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.