आनंद आश्रम झाले शिवसेनेचे मुख्य केंद्र

By अजित मांडके | Published: February 27, 2023 11:21 AM2023-02-27T11:21:11+5:302023-02-27T11:21:47+5:30

टेंभी नाक्यावरील आनंद मठ आताचे आनंद आश्रम ऐतिहासिक वास्तू म्हणावी लागणार आहे. पूर्वी पारशी लोकांची ही जागा होती.

Anand Ashram became the main center of Shiv Sena | आनंद आश्रम झाले शिवसेनेचे मुख्य केंद्र

आनंद आश्रम झाले शिवसेनेचे मुख्य केंद्र

googlenewsNext

- अजित मांडके, प्रतिनिधी
म्हाला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणा, असे पहिले पत्र ठाण्यातील आनंद आश्रम येथून निघाले आणि शिवसेनेचे नव शिवसेना भवन हे आता ठाण्यात असेल, हे स्पष्ट झाले. त्यामुळे आनंद आश्रमाचे राजकीय महत्त्व आणखी वाढणार आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी अनेक चळवळी, आंदोलने, शिवसेना मोठे करण्याचे काम केले. कधीही निवडणुकीची रणनीती या केंद्रातून आखली नाही. त्यासाठी सूर्या हे कार्यालय निश्चित केले होते. आता नव्या शिवसेनेचे मुख्य केंद्र हे आनंद आश्रम झाल्याने येथून निवडणुकीचे राजकारण चालणार की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी वेगळ्या जागेची निवड करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टेंभी नाक्यावरील आनंद मठ आताचे आनंद आश्रम ऐतिहासिक वास्तू म्हणावी लागणार आहे. पूर्वी पारशी लोकांची ही जागा होती. १९६८च्या सुमारास दिवंगत आनंद दिघे यांनी ही जागा भाड्याने घेतली. त्यासाठी १५० रुपयांच्या आसपास भाडे आकारले जात होते. तेव्हापासून याची ओळख आनंद मठ अशी झाली. येथून दिघे यांनी शिवसेना वाढीबरोबरच अनेक आंदोलने, चळवळी उभारल्या. हजारोंच्या संख्येने तरुणांना नोकरीचे अर्ज दिले गेले. अनेक बहिणी तासन् तास रांगेत उभे राहून दिघे यांना राखी बांधत होत्या. या आनंद मठातील एका छाेट्या खाेलीत त्यांचे वास्तव्य होते. दिघे यांच्या निधनानंतर त्यांची खुर्ची तेथे असून, शिवसैनिक येथे नतमस्तक हाेतात.
आनंद मठाची वास्तू जुनी झाली हाेती. ती पाडून नवीन वास्तू बांधली. तिला वाड्याचे स्वरूप देण्यात आले असून, ‘आनंद आश्रम’ असे नामकरण झाले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर या आनंद आश्रमाचे महत्त्व वाढले. शहरातील शाखा, आनंद आश्रम ताब्यात घेण्यावरून वादही रंगले. राजकीय घडामाेडींचे हे केंद्रबिंदू ठरले. शिंदे मुख्यमंत्री हाेताच, आनंद आश्रमातूनच शिवसेनेचा कारभार चालणार हे निश्चित झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम असे त्याचे नामकरण केले.

निवडणुकीचे कार्यालय कोणते?
शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळाले व त्याच्या काही क्षणांनंतर याच आनंद आश्रमातून पहिले पत्र धाडले गेले, तेव्हाच आनंद आश्रमातून शिवसेनेचा कारभार चालणार हे निश्चित.

या आनंद आश्रमात वेगळी ऊर्जा असल्याने, दिघे यांनी या ठिकाणाहून निवडणुकीची कामे केव्हाही केलेली नसल्याचे जाणकर सांगतात. त्यासाठी ते सूर्या या कार्यालयावर मुक्कामी असत. सूर्या या कार्यालयातून निवडणुका लागल्यापासून फॉर्म वाटप ते अगदी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत दिघे यांचा मुक्काम असायचा. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणासाठी आनंद आश्रमाची निवड करणार की, सूर्या कार्यालयाकडे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Anand Ashram became the main center of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.