आनंद आश्रमाचा शिंदे समर्थकांनी घेतला ताबा? ठाकरे समर्थक गाफील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:01 AM2022-06-30T11:01:54+5:302022-06-30T11:02:39+5:30
शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे ठाण्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट आम्ही शिवसेनेत असून शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. शिंदे समर्थकांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले.
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाण्यातील स्व. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाचा बुधवारी ताबा घेतल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखांचा ताबा घेण्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आनंद आश्रमाचा शिंदे यांनी ताबा मिळवला आहे. आता ठाकरे समर्थक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचे ठाण्यात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे यांना मानणारा गट आम्ही शिवसेनेत असून शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. शिंदे समर्थकांनी शहरभर बॅनर, पोस्टर लावून त्यांचे समर्थन केले.
शक्तिप्रदर्शनातून ताकद दाखवून दिली. आनंद आश्रमाजवळ सोमवारी शिंदे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमाजवळ शक्तिप्रदर्शन केले. शिंदे समर्थकांनी आनंद आश्रमाचा ताबा घेण्यास सुरुवात केली. हा ताबा घेत असताना शिवसैनिकांनी अद्याप त्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध केलेला नाही.
दरम्यान आनंद आश्रमाची पडझड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. आता हे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्या कामावर देखरेख ठेवण्याकरिता तेथे जात असल्याचे शिंदे समर्थक सांगत आहेत.
आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्ही शिवसेनेतून कुठेही गेलेलो नाही. आनंद आश्रमाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते कसे सुरू आहे, याची केवळ पाहणी करण्यासाठी आम्ही आनंद आश्रमात जमा झालो होतो.
- संजय मोरे, माजी महापौर, ठाणे