जितेंद्र आव्हाडांच्या फलकावर आनंद दिघे; अनेकांच्या भुवया उंचावल्या
By अजित मांडके | Published: January 27, 2023 04:17 PM2023-01-27T16:17:16+5:302023-01-27T16:17:50+5:30
आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक पहिल्यांदाच शहरभर लावल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे आम्हीच शिष्य असल्याचे दाखविण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. असे असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या फलकांवर आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आल्याने ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक पहिल्यांदाच शहरभर लावल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
ठाणे महापालिकेत शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली. त्यानंतर जिल्ह्यातील इतर पालिकांमध्ये शिवसेनेला सत्ता मिळविण्यात यश आले. यामध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. घराघरात शिवसेना पोहचविण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे 'आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा...शिवसेनेचा बालेकिल्ला' असे म्हटले जात होते. आनंद दिघे यांचे २१ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविली. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत सहा महिन्यांपुर्वी नवे सरकार स्थापन केले. या बंडाळीनंतर ठाणे जिल्ह्यातून त्यांना मोठे समर्थन मिळाले.
खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मात्र ठाकरे यांची साथ दिली. शिवसेनेतील बंडाळीनंतर आनंद दिघे यांचे आम्हीच शिष्य असल्याचे दाखविण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. असे असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या फलकावर आनंद दिघे यांचे छायाचित्र झळकले आहेत. आनंद दिघे यांचे इतर पक्षातील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध होते. त्याकाळी जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे काम करीत होते.
आनंद दिघे यांच्याशी चांगले संबंध असले तरी त्यांनी त्यांचा फोटो फलकावर लावल्याचे दिसून आले नव्हते. परंतु यंदा पहिल्यांदाच आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक लावले असून ठाणे शहर, राबोडी, कळवा भागात लावण्यात आलेल्या या फलकांमुळे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळा लावत पक्ष प्रवेशाची तयारी सुरू केली असून यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांनी हे फलक लावले तर नाहीत ना, अशी चर्चा शहरात यानिमित्ताने सुरू झाली आहे.