"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:52 PM2022-08-19T14:52:38+5:302022-08-19T14:54:22+5:30

राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात यावेळी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

Anand Dighe sister told me about thane leader CM is the wish of anand dighe says eknath shinde in dahihandi | "आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा

"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा

googlenewsNext

ठाणे-

राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात यावेळी एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याला एक ठाणेकर मुख्यमंत्री मिळाला म्हणून टेंभी नाक्याची दिवंगत शिवसेनेचे नेते आणि धर्मवीर आनंद दिघेंची मानाची हंडी यावेळी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्यावरील दहीहंडीला उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला. 

"ठाणेकर मुख्यमंत्री व्हावा अशी धर्मवीर आनंद दिघेंची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणाताई यांनी माझ्याजवळ आनंद दिघेंची ही इच्छा बोलून दाखवली होती", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. टेंबी नाक्यावरील दहीहंडीला गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आहे. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील उपस्थित होती. 

"आज मानाच्या दहीहंडीला उपस्थित राहताना मला आणखी एका गोष्टीचा खूप आनंद आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे धर्मवीर आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. दिघेंच्या भगिनी अरुणाताई यांनी माझ्याजवळ ही इच्छा बोलून दाखवली होती. ते आज खरं झालं आहे म्हणजे दिघे साहेबांची काय दूरदृष्टी होती हे यातून दिसून येतं", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

"राज्यातील सरकार हे जसं शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचं आहे. तसं ते गोविंदांचंही सरकार आहे. टेंबी नाका म्हणजे गोविंदांची पंढरी. महाराष्ट्राचा हा इतिहास, परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं. आज प्रत्येक गोविंदा पथक टेंभी नाक्याच्या दहीहंडीला सलामी देऊन दहीहंडीला सुरुवात करतो. आनंद दिघेंनी दहीहंडीचा उत्सव राज्यभर नेला. त्याच गोविंदांसाठी राज्य सरकारनं तीन महत्वाचे निर्णय घेतले. दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी, १० लाखांचा विमा आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम आम्ही केलं", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

 

 

Web Title: Anand Dighe sister told me about thane leader CM is the wish of anand dighe says eknath shinde in dahihandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.