गद्दारांना दिघे हेच शिक्षा देतील; राजन विचारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टिका
By अजित मांडके | Published: January 27, 2024 02:20 PM2024-01-27T14:20:59+5:302024-01-27T14:22:44+5:30
शक्तीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार असल्याने त्यांच्या वतीने याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे खरे शिवसैनिक कोण हे आता आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. आगामी काळात दिघे हेच या गद्दारांना जागा दाखवतील अशी टिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली.
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जंयत्तीच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी शनिवारी दिघे यांच्या शक्ति स्थळावरील समाधिस अभिवादन करून दर्शन घेतले. तसेच टेंभी नाका येथील दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे, दिघे साहेब अमर रहे या अशा घोषणाही त्यांनी दिल्या. यावेळी ठाकरे गटाने टेंभी नाका आणि शक्तीस्थळावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला.
शक्तीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार असल्याने त्यांच्या वतीने याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ची वेळ शिंदे यांची होती, मात्र त्यांना उशीर झाल्याने त्याच वेळेस विचारे यांनी याठिकाणी येऊन दिघे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दिघे हे ठाणे जिल्ह्याचे दैवत होते, मात्र आज त्यांच्या नावावर निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्या घरांवर नांगर फिरविला जात आहे. त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे अशा पध्दतीने स्वत:ला सच्चे शिवसैनिक मानणाºयांना आता जनताच उत्तर देईल अशी टिकाही विचारेी यांनी केली.
दरम्यान शक्ती स्थळावर शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, आदींसह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.