ठाण्यात आनंदी आनंद गडे; अंतर्गत मेट्रो, जलवाहतुकीला प्राधान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:18 AM2018-03-20T02:18:02+5:302018-03-20T02:18:02+5:30
लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधणे, मानसिक शांती, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली, सुप्रशासनातून ठाणेकरांचा ‘हॅप्पीनेस निर्देशांक’ वाढवण्याचा अर्थात आनंदी वातावरण निर्मितीचा संकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून सोडला.
ठाणे : लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधणे, मानसिक शांती, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली, सुप्रशासनातून ठाणेकरांचा ‘हॅप्पीनेस निर्देशांक’ वाढवण्याचा अर्थात आनंदी वातावरण निर्मितीचा संकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातून सोडला. यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प त्यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांना सादर केला.
विद्यार्थ्यांची संख्या घटणाऱ्या शाळा खाजगी संस्थांना चालवायला देणे, वाहतूककोंडी फोडणे, क्लस्टर योजना, पीआरटीएसअंतर्गत जलवाहतूक, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प, चौपाट्या-तलावांचा विकास, पार्किंग सुविधा आदी महत्त्वाच्या योजनांचा समावेश असलेला, करवाढ- दरवाढ नसलेला ३६९५.१३ कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. यावेळी त्यांनी २०१७-१८ चा ३०४७.१९ कोटींचा अर्थसंकल्पही सादर केला.
अर्थसंकल्पात प्रथमच विशेष प्रकल्पांतर्गत लोकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढवण्यावर भर दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी १०० कोटींची तरतूद आहे. पालिकेने जगभरातील विविध शहरांचा अभ्यास करून बेस्ट पॅ्रक्टिसवर आधारित काही महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत.
ठाणे शहरांतर्गत मेट्रो, अंतर्गत जलवाहतुकीचा तपशील देतानाच वडाळा ते कासारवडवली या मेट्रोच्या कामाला मे अखेरपर्यंत सुरूवात होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
- सविस्तर तपशील/३
ग्लोबल चॅलेंज फंड
शहरातील नवउद्योजकांना निधी उभारण्यासाठी हा फंड निर्माण करण्यात येणार असून यामध्ये नावीण्यपूर्ण कल्पना असणाºया सर्वोत्तम प्रस्तावांना निधी मिळवून देण्यासाठी पालिका मदत करणार आहे. यासाठी पाच कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.
सार्वजनिक व खाजगी शाळा भागीदारी
खाजगी शाळा आणि महापालिकेच्या शाळांमध्ये असणारी बलस्थाने शोधून त्याचा उपयोग करून शालेय मुलांना भेडसावणाºया विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी भागीदारीत शाळा प्रकल्प राबवण्यासाठी १ कोटींची तरतूद.
रेडिओ स्कूल
रेडिओ संकल्पनेद्वारे मुलांचा विकास करण्यासाठी रेडिओ विद्यालय संकल्पना राबवण्यासाठी ३० लाखांची तरतूद
समुपदेशन केंद्र नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या मनात असलेले नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी एक कोटी.
धूरविरहित केंद्र महापालिका हद्दीत होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून स्मोक फ्री टॉवर उभारण्यात येणार असून यासाठी पाच कोटी.
समाजविकास आणि नागरिक केंद्रित सुधारणा
विविध समस्यांचे निराकरण करून केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांच्या समुदायाचा विकास करण्यासाठी नागरिक केंद्रित व्यवस्था स्थापनेसाठी आठ कोटींची तरतूद
जीआयएस सर्व्हे
जीआयएस प्रणालीद्वारे महापालिकेच्या विविध करांसाठी एकच प्लॅटफॉर्म तयार करून नागरिकांना कर भरण्यास सुलभता यावी, यासाठी सर्व मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे करण्यासाठी १५ कोटींची तरतूद
अनुकूल ट्रॅफिक व्यवस्थापन यंत्रणा
वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करून प्रवाशांची वाहतूक सुलभ करण्यासाठी आठ कोटींची तरतूद.
डिजिटल मेसेजिंग सिस्टीम
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने नागरिकांपर्यंत विविध सूचना पोहोचवण्यासाठी या यंत्रणेची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी तीन कोटी.
आरोग्यसुविधा : क्षयरोग दत्तक योजना - महापालिका हद्दीत ३३०० क्षयरोग रुग्ण उपचार घेत आहेत. एका रुग्णाच्या कुटुंबात एकूण पाच व्यक्ती गृहीत धरून दत्तक योजना राबवण्याचा पालिकेचा मानस असून त्यानुसार या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची वेळोवेळी तपासणी करणे, भेटी देऊन रुग्णास अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना प्रतिवर्ष क्षयरोग या आजाराचा संसर्ग झाला आहे अथवा नाही, त्यानुसार आवश्यक त्या तपासण्या करण्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये मासिक खर्च देणे आदींच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी दोन कोटींची तरतूद प्रस्तावित.
कुटुंब सौख्य योजना
गृहकलह मिटवण्यासाठी एका व्यक्तीसाठी सहा समुपदेशन बैठका घ्याव्या लागतात. प्रतिबैठकीसाठी ५०० या प्रमाणे ३०० व्यक्तींसाठी वार्षिक नऊ लाख
सर्वांसाठी
कौशल्य विकास
व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरद्वारे कुशल कामगार व उद्योजक यांची निर्मिती करण्यासाठी २५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.
रे आॅफ लाइट
कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी विविध सुविधा असणाºया वाहनांद्वारे वैद्यकीय सेवा पुरवल्या जाणार असून त्यासाठी एक कोटी
क्षयरोग नियंत्रण वाहन
विविध वैद्यकीय सुविधा असणाºया वाहनांद्वारे, क्षयरोगग्रस्त रुग्णांना सेवा पुरवल्या जाणार असून त्यासाठी दोन कोटी.