जीवनविद्या मिशनमध्ये ‘आनंद मेळावा’; सद्गुरू श्री वामनराव पै यांची जन्मशताब्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2022 07:18 AM2022-10-30T07:18:05+5:302022-10-30T07:18:23+5:30
समारंभाचे उद्घाटन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
कर्जत : सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारपासून जीवनविद्या मिशनमध्ये ‘आनंद मेळाव्या’चा प्रारंभ करण्यात आला. २०२२-२०२३ हे वर्ष सद्गुरू वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. कर्जत येथील सुखाचे प्रवेशद्वार असलेल्या जीवनविद्या ज्ञानपीठात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभाचे उद्घाटन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ प्रबोधक आणि माजी विश्वस्त शिवाजीराव पालव तसेच माजी विश्वस्त आणि ज्येष्ठ नामधारक विश्वासराव देशपांडे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान झाले. जीवनविद्या मिशनने महाजन यांचा सत्कार केला.
महाजन यांनी जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा विचार अतिशय भावला, असे देखील ते म्हणाले. वैभव निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. जीवनविद्या मिशनचे तत्त्वज्ञान आणि श्री सद्गुरूंच्या आशीर्वाद यामुळे स्पर्धा परीक्षा पास होणे आणि तो संपूर्ण प्रवास सहज शक्य झाला, असे सांगून त्यांनी सद्गुरूंनी सांगितलेले सात ‘क’ त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे ठरले हे अनुभव बोल व्यक्त केले.
युवा नामधारक सिद्धेश नारकर हा जागतिक कॅलेस्थॅनिक स्पर्धेत यश संपादन केले. त्याबद्दल प्रल्हाद वामनराव पै यांनी कौतुक केले. जीवनविद्या ही मानसिक अंपगत्वावर पूरक उत्तर असल्याचे सांगितले. जीवनविद्या मिशन गेली अनेक वर्षे समाजसेवेच कार्य करत आहे. हे वर्ष जन्मशताब्दी वर्षे म्हणून साजरे केले जाणार आहे. म्हणून प्रत्येक नामधारकाने ऑफिस, घर आणि समाजसेवेचे कार्य करत असताना प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची हा संदेश लक्षात ठेवून कार्य करावे, असे मार्गदर्शन यावेळी प्रल्हाद वामनराव पै यांनी केले. याप्रसंगी दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन, आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर आदी उपस्थित होते.