पायाभूत प्रकल्पाबाबत विद्यमान खासदार कमी पडताहेत, आनंद परांजपेंची शिवसेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 11:18 AM2018-03-22T11:18:24+5:302018-03-22T11:18:24+5:30
माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ''आपण खासदार म्हणून निवडून आल्यावर मतदारसंघामध्ये रेल्वे आणि रस्त्यांच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य दिलं होतं.
डोंबिवली - माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ''आपण खासदार म्हणून निवडून आल्यावर मतदारसंघामध्ये रेल्वे आणि रस्त्यांच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांना प्राधान्य दिलं होतं. केवळ पाठपुरावा करून हे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले असते. परंतू दुर्दैवाने विद्यमान खासदार हे प्रकल्प पूर्ण करण्यात कमी पडले आहेत'', अशी टीका कल्याण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केली. कल्याण डोंबिवली पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रखडलेले महत्त्वाचे विकासप्रकल्प, मतदारसंघाची सद्यस्थिती, रेल्वेचे प्रश्न, कल्याण डोंबिवली महापालिकेतील गलिच्छ राजकारण आदी विषयांबाबत अत्यंत बोचऱ्या शब्दांत आपली मते व्यक्त केली. खासदार म्हणून काम करत असताना आपण गटार आणि मीटर या नगरसेवकांच्या कामापेक्षा खासदाराच्या पदाला शोभतील अशा विकासकामांवर जास्त भर दिला. देशातील सर्वात मोठा मतदारसंघ अशी ठाणे जिल्ह्याची ओळख होती.
तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील 80 टक्के मतदार हे रेल्वेने प्रवास करणारे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्रासदायक ठरणाऱ्या रेल्वे प्रवासातून दिलासा देण्याच्या उद्दिष्टाने आवश्यक रेल्वे प्रकल्पाना आपण प्राधान्य दिले. मग त्यामध्ये कल्याण टर्मिनस, 5व्या-6व्या रेल्वेमार्गाचे काम, ठाकुर्ली पूल, एस्केलेटर्स आदीचा पाठपुरावा केला. त्याचजोडीला कल्याण डोंबिवलीतील वाहतूक समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणारे मोठा गाव ते माणकोली पूल, रिंगरूट, कल्याण-शिळ मार्गाचे रुंदीकरण अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी प्रयत्नशील होतो. जेणेकरून 2019 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण झाले तर केवळ आपल्या मतदारसंघातील लोकांनाच नव्हे तर कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असता असे परांजपे यांनी सांगितले.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे निवडून आल्यानंतर आपण त्यांना हे प्रकल्प पूर्ण करून घेण्याबाबत बोललो होतो. 2019 पर्यंत हे जुने प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र ते होताना दिसत नाहीये आणि नवीन प्रकल्प तर अद्याप दूरच असल्याचे सांगत विकास प्रकल्प करून घेण्यात सत्ताधारी खासदार कमी पडत आहेत. येत्या 10 वर्षांत मतदारसंघात काय प्रश्न निर्माण होऊ शकतात हा खासदार म्हणून विचार करून आपण काम केले पाहीजे. परंतू शिवमंदिर महोत्सव सोडला तर डॉ.श्रीकांत शिंदे यांचे काम काय? असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सत्ताधारी लोकांकडे विकासाचा अजेंडा, दृष्टिकोनच नाहीये. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार केवळ एकमेकांशी स्पर्धा करण्यामध्ये मश्गुल आहेत. त्यांच्या या अशा बेजबाबदार वागण्याचे दुष्परिणाम दोन्ही मतदारसंघातील विकासकामांवर होणार आहेत. तर आपण खासदार असताना प्रत्येक प्रकल्पासाठी एकटेच केंद्रीय मंत्री किंवा केंद्रातील संबंधितांची भेट घ्यायचो. एकदाही आपल्या पालकमंत्र्यांना घेऊन जाण्याची वेळ आपल्यावर आली नाही. परंतु विद्यमान खासदारांची प्रत्येक बैठक ही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्हे तर कुशीतच होत असते असा मिश्किल टोलाही आनंद परांजपे यांनी यावेळी लगावला.