डॉ.आनंद नाडकर्णी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:48 AM2021-09-17T04:48:28+5:302021-09-17T04:48:28+5:30
ठाणे - अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हा प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी ...
ठाणे - अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हा प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अनंत भालेराव हे ख्यातनाम पत्रकार होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी ज्या पद्धतीने बंदूक चालविली त्याच धडाडीने नंतरची तीन दशके लेखणीहि चालविली. साहित्य, संगीत, नाटय, कला, शिक्षण, समाजकार्य, पत्रकारिता, नागरी जीवन यांच्या विकासासाठी त्यांनी आपले जीवन वाहिले. त्यांचा आदर्श नवीन पिढीसमोर राहावा म्हणून प्रतिष्ठान दरवर्षी त्यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ लोकजीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार हा देऊन गौरविते. एक मानसोपचार तज्ञ म्हणून डॉ.नाडकर्णी सामाजिक जाणीवेतून सामाजिक स्वास्थ्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत. साहित्य, नाट्य, व्याख्याने याद्वारे ते समाजाभिमुख कार्य करतात.
आतापर्यंत हा पुरस्कार गोविंद तळवलकर, विजय तेंडुलकर , डॉ.अभय बंग, मंगेश पाडगावकर, मृणाल गोरे, डॉ. अनिल अवचट, निळू फुले, वसंत पळशीकर, अरुण टिकेकर, कुमार केतकर, महेश एलकुंचवार , नरेंद्र दाभोळकर (मृत्यूपश्चात) आदी आपापल्या क्षेत्रात थोर कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंना दिला गेला आहे.