...आणि अनयाचा वाढदिवस अखेरचा ठरला
By admin | Published: August 5, 2015 01:35 AM2015-08-05T01:35:52+5:302015-08-05T01:35:52+5:30
कृष्णा निवासमध्ये राहणाऱ्या अनया (७) हिचा सोमवारी एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करून पुन्हा त्याच आनंदात घरी परतून गाढ झोपेत असलेल्या
ठाणे : कृष्णा निवासमध्ये राहणाऱ्या अनया (७) हिचा सोमवारी एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करून पुन्हा त्याच आनंदात घरी परतून गाढ झोपेत असलेल्या अरुण सावंत यांच्या कुटुंबावर मृत्यूने घाला घातला. काही कळायच्या आत ही इमारत कोसळली आणि झोपेतच या कुटुंबातील चार जणांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. यामध्ये अनयालासुद्धा मृत्यूने कवटाळले.
या इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले रामचंद्र भट हे त्यांची पत्नी मीरा, मुलगी रश्मी, रुचिता आणि भाऊ सुब्बाराव यांच्यासोबत राहत होते. त्यांची मोठी मुलगी रश्मी हिचा दोन महिन्यांपूर्वीच ४ जूनला वर्तकनगर येथे राहणाऱ्या करण मांगे याच्याबरोबर विवाह झाला होता. तो दुबईत नोकरी करीत असल्याने ते दोघेही तिथेच राहत होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी ती दुबईहून ठाण्यात आली होती. त्यानंतर करण हा कामासाठी गुजरातला गेला होता. रश्मी ही तिच्या सासरीच राहत होती. तर तिसऱ्या मजल्यावर अरु ण दत्तात्रय सावंत (६२) हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने ते लोढा कॉम्प्लेक्स येथे राहायला गेले होते. परंतु ते वर्षभरापूर्वीच पुन्हा येथे राहण्याा आले होते. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी भक्ती, नात अनया आणि जावई अमित खोत हे राहत होते. तर त्यांचा मुलगा अमित हा नोकरीसाठी अमेरिकेला होता. दरम्यान, भक्तीची मुलगी अनया हिचा ३ जूनला पाचवा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्याकरिता अमित अमेरिकेहून ठाण्यात आला होता.
दरम्यान, रश्मी आणि भक्ती या लहानपणापासूनच्या मैत्रिणी असल्याने अनयाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता तीसुद्धा वर्तकनगरहून आपल्या माहेरी आली होती. सोमवारी रात्री भट आणि सावंत कुटुंबीय एका हॉटेलमध्ये अनयाचा वाढदिवस साजरा करून घरी परतले होते. त्यानंतर रात्री उशिरा रश्मी आणि तिच्या मावशीचे फोनवर बोलणेही झाले. मात्र रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी ही इमारत पडली आणि या घटनेत संपूर्ण भट कुटुंबीय रश्मीसह मृत्युमुखी पडले, तर सावंत कुटुंबातील अरुण सावंत, मुलगा अमित, मुलगी भक्ती, नात अनया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांचा जावई अमित खोत हा सुदैवाने या दुर्दैवी घटनेतून बचावला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.