...आणि तिच्यासाठी देवदूत बनले डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:44+5:302021-09-14T04:47:44+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यातील बिरवाडी येथील कातकरी या (आदिम) जमातीतील मुलगी मुक्ता जाधव या गर्भवतीला बाळंतपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने ...
भातसानगर : शहापूर तालुक्यातील बिरवाडी येथील कातकरी या (आदिम) जमातीतील मुलगी मुक्ता जाधव या गर्भवतीला बाळंतपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती गंभीर बनली हाेती. या स्थितीत तिच्या पतीला काहीच सुचेनासे झाले. त्याने तत्काळ ‘लाेकमत’च्या प्रतिनिधीकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर लाेकमतच्या माध्यमातून खासगी रुग्णालयाचे डाॅ. अविनाश बढीए यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पैशांची चिंता करून नका असा धीर देत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मुलाचे वजन आणि डाेके माेठे असल्याने अखेर सिझरियनद्वारे प्रसूती करण्यात आली. या महिलेने गाेंडस मुलाला जन्म दिला असून बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत. डाॅ. बढीए हे मायलेकासाठी देवदूत बनूनच धावून आले.
मुक्ता हिचे वय कमी असल्याने ही प्रसूती गुंतागुंतीची बनली हाेती. उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांनी खूप प्रयत्न केले, मात्र ऑपरेशन थिएटरचे काम सुरू असल्याने सिजेरियन करणे शक्य नव्हते. त्यामुळे या महिलेला तत्काळ ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वेळ खूप कमी असल्याने पतीसमाेर माेठी समस्या निर्माण झाली. तसेच हातावर पाेट असल्याने उपचारांसाठी पैशांची चिंताही त्याला सतावत हाेती. त्यातच तिच्या आजीचेही निधन झाल्याने तिच्यासोबत काेणीच नव्हते. या कठीण प्रसंगी तिच्या पतीने लाेकमतच्या प्रतिनिधीकडे संपर्क सांधून आपली अडचण सांगितली. त्यानंतर तत्काळ डाॅ. बढीए यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला. या महिलेने गाेंडस बाळाला जन्म दिल्यानंतर दाेघेही सुखरूप असल्याचे पाहून पतीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. मात्र, खासगी रुग्णालय असल्याने बिलाची चिंता त्याला सतावत हाेती. मात्र, केवळ मेडिकलचे बिल घेऊन रुग्णाला घरी साेडण्यात आले. मुलीचे वडील दत्ता मुकणे यांनी डाॅक्टरांकडे बिलाची विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या मुद्रेकडे पाहताच त्यांच्या पाठीवर हात ठेवून काळजी करू नका, असे सांगून घरी जाण्यास सांगितले. या सहकार्यामुळे लोकमतचे व डॉक्टरांचे पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी आभार मानले.