अन् दोघांचा फुलला संसार, पतीने दिली साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:40 AM2021-08-15T04:40:33+5:302021-08-15T04:40:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पतीसोबत वाद झाला आणि ती मनोरुग्ण असतानाच घराबाहेर पडली. मधल्या काळात राहण्यासाठी संघर्ष करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पतीसोबत वाद झाला आणि ती मनोरुग्ण असतानाच घराबाहेर पडली. मधल्या काळात राहण्यासाठी संघर्ष करीत असताना एकेदिवशी भरकटत पोलिसांना आढळली. त्यांनी तिला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. अखेर बरे झालेल्या त्या महिलेला तिच्या पतीने आपल्या घरी परत नेले असून आता दोघांचा संसार छान फुलला असल्याची माहिती मनोरुग्णालयाने दिली. आता दोघेही आपल्या संसाराचे स्वातंत्र्य उपभोगत आहेत.
जवळपास ३२ वर्षांची ही महिला मुंबई येथे राहते. पतीसोबत वाद झाला अन् ती घराबाहेर पडली. बहिणीकडे राहायला गेली असता तिनेही तिला नीट न सांभाळता घराबाहेर हकलून दिले. दरम्यान, तिच्यावर उपचार सुरूच होते. आई-वडील रत्नागिरीला असल्याने ती त्यांच्याकडे गेली पण समाजाच्या भीतीने त्यांनीही तिला ठेवून घेतले नाही. तिथूनही तिला घराबाहेर पडावे लागले. त्यानंतर ती मुंबईत परतली खरी पण ना बहिणीकडे गेली ना पतीच्या घरी. अशीच भरकटत असताना एकेदिवशी ती काशीमीरा पोलिसांना आढळली. त्यांनी तिला कायदेशीर कार्यवाही करून ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. मनोरुग्णालयाच्या समाजसेवा अधीक्षक नीलिमा केसरकर यांनी तिचे समुपदेशन केले. दोन ते तीन महिन्यांनी तिने पत्ता व पतीबद्दल माहिती दिली. तिचा पत्ता अत्यंत गोंधळात टाकणारा होता. तरीही प्रथम पतीची माहिती काढली व त्याच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली. त्यानंतर त्या दोघांचे केसरकर यांनी समुपदेशन केल्यावर पतीने तिला आपल्या घरी नेण्याची तयारी दर्शविली. मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिची घरवापसी झाली. ती आपल्या पतीसोबत मनोरुग्णालयात उपचाराला येत असताना संसाराच्या गप्पा करीत होती, हे ऐकून आनंद झाल्याचे केसरकर यांनी सांगितले. आता पूर्ण ती बरी झाली असून दोघेही सुखाने एकत्र नांदत असल्याचे बोदाडे यांनी सांगितले.
-----------------
समुपदेशन आणि औषधोपचाराने मनोरुग्ण सामान्य जीवन जगू शकतो असे केसरकर यांनी सांगितले.