...तर ‘व्हिजन डोंबिवली’ला निधी देणार
By admin | Published: April 20, 2016 01:55 AM2016-04-20T01:55:51+5:302016-04-20T01:55:51+5:30
अस्वच्छ शहराचा डाग पुसण्यासाठी ‘व्हिजन डोंबिवली’द्वारे तुम्ही केलेल्या निश्चयाच्या मी पाठीशी आहे. डोंबिवलीकरांनी डोंबिवलीकरांसाठी चालवलेल्या या लोकचळवळीसाठी ‘
डोंबिवली : अस्वच्छ शहराचा डाग पुसण्यासाठी ‘व्हिजन डोंबिवली’द्वारे तुम्ही केलेल्या निश्चयाच्या मी पाठीशी आहे. डोंबिवलीकरांनी डोंबिवलीकरांसाठी चालवलेल्या या लोकचळवळीसाठी ‘सीएसआर’चा निधी कमी पडल्यास महापालिका निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले.
डोंबिवली शहर स्वच्छ, सुरक्षित व स्वस्थ करण्यासाठी डोंबिवलीत सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था व व्यक्ती यांच्या माध्यमातून ‘व्हिजन डोंबिवली कृती गट’ तयार केला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ कान्होजी जेधे मैदानात झाला. या वेळी संकेतस्थळाचेही उद्घाटन झाले. या वेळी देवळेकर बोलत होते. व्यासपीठावर डॉ. उल्हास कोल्हटकर, प्रज्ञेश प्रभुघाटे, दिलीप देशमुख, बाळू नेहते, राजेश कोरपे, अभिजित जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
देवळेकर म्हणाले की, ‘व्हिजन डोंबिवली’ची चार उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी डोंबिवलीकरांनी पुढाकार घेतला आहे. आता प्रश्न फक्त कल्याणचा आहे. तेथेही त्यासाठी २५ एप्रिलला बैठक होणार आहे. या चळवळीत लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महापालिकेने एक नियमावली तयार केली आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यास दंड ठोठावणे, टाक्या साफ करणे आदी गोष्टींचा अंतर्भाव असेल. प्रत्येक वॉर्डात स्वच्छतादूत नेमले जाणार आहेत. उद्याने हिरवी करण्यासाठीही कार्यक्रम आखला जाईल. शहर स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न केले जातील. यासंदर्भात नागरिकांना काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी त्या ‘व्हिजन डोंबिवली’ला कराव्यात, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
कार्यक्रमापूर्वी झालेल्या सायक्लोथॉनमध्ये २५० जणांनी सहभाग घेतला होता. त्याचा प्रांरभ अप्पा दातार चौकात झाला. त्यानंतर फडके रोड, बाजीप्रभू चौक, ओव्हरब्रीजमार्गे जाऊन तिचा कान्होजी जेधे मैदानात समारोप झाला.