... आणि गोरगरीब लोकांच्या मदतीला धावले केणी कुटुंब, एका दिवसात १००० कुटुंबाना दिले घरपोच रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:39 PM2020-03-27T18:39:29+5:302020-03-27T18:41:22+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळव्यातील केणी कुटुंबांनी गोर गरीब जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शुक्रवारी एका दिवसात तब्बल १००० कुटुंबांना केणी यांनी घरपोच रेशन दिले आहे. तसेच आपल्या पत्नीच्या कार्यालयात त्यांनी स्वत: दरात भाजीपाल्याची व्यवस्था केली आहे.
ठाणे : कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल यामुळे सुरु झाले आहेत. मात्र अशा लोकांना सहारा देण्याचे काम, त्यांना महिन्याचे रेशन ते सुध्दा घरपोच देण्याचे काम सध्या कळव्यातील नगरसेवक मुकुंद केणी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सुरु केले आहे. केणी हे स्वत: कळव्यातील विविध भागात फिरुन घरपोच रेशन देण्याचे काम करीत आहेत. त्यानुसार शुक्रवारी एका दिवसात केणी कुटुंबाने १००० कुटुबांना रेशन दिले आहे. तसेच पुढील काही दिवस ही सेवा अशीच सुरु ठेवण्यात येणार आहे.
कोरोना चा प्रार्दूभाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. परंतु यामध्ये सर्वसामान्य नागरीक, हातावरचे पोट असणारे, रोज कमवून रोज खाणारे असे असंख्य कुटुंब आहेत, की ज्यांना खाण्यासाठी देखील घरात काहीच नाही. अशा कुटुंबांचे तारणहार बनत आहेत, कळव्यात केणी कुटुंब. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, त्यांचे पती मुकुंद केणी, पुत्र मंदार केणी यांच्यासह कुटुंबातील प्रत्येकाने या कार्यात मोठा वाटा उचलला आहे. सध्या केणी कुटुंबाकडून कळव्यातील गोर गरीब, हातावरील पोट असणाऱ्यां कुटुंबाची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी मुकुंद केणी हे स्वत: प्रत्येकाच्या घरी जाऊन रेशन कीट देत आहे. दिवसभरात त्यांनी १००० कुटुंबांना रेशन दिले आहे. यामध्ये दोन किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक किलो छोले, एक किलो साखर, एक लीटर तेल आणि एक फॅमीली पॅक बिस्कीटचा पुडा असे साहित्य पुरविले जात आहे. या कामात संपूर्ण केणी टीमने स्वत:ला झोकुन दिले आहे. याशिवाय कळव्यातील नागरिकांना भाजीपाला सहजगत्या उपलब्ध व्हावा याकरिता देखील केणी यांनी त्यांच्या पत्नी ठामपा विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांच्या बुधाजी नगर येथील जनसंपर्ककार्यालयात माफक दरात भाजीपाला विक्र ी केंद्र सुरू केले आहे. त्याचाही फायदा येथील रहिवाशांना होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले आहे. परंतु आपली देखील काही जबाबदारी असल्याने अशा पध्दतीने आमच्या कुटुंबांने हे पाऊल उचलले आहे. पुढील काही दिवस अशा पध्दतीने गोरगरीब जनतेला ही मदत दिली जाणार आहे.
(मुकुंद केणी - नगरसेवक , ठामपा)