जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी सेविका, आशांना आदर्श पुरस्कार
By सुरेश लोखंडे | Published: March 28, 2023 07:10 PM2023-03-28T19:10:04+5:302023-03-28T19:10:11+5:30
ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार साेहळा पार पडला.
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून गांवपाड्यांमध्ये अंगणवाडीसह आराेग्य सेवेचे उत्कृष्ट काम करणार्या जिल्ह्यातील महिलांना आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा पुरस्कार देऊन आज सन्मानीत करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार साेहळा पार पडला.
येथील नियोजन भवनमध्ये हा पुरस्कार वितरण साेहळा व या अंगणवाडी सेविकांची व आशांची कार्यशाळाही पार पडली आहे. यावेळी दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जिंदल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी थियेटर ऑफ रेलेवंस यांच्या तर्फे लोक-शास्त्र सावित्री हा नाट्यप्रयाेगही यावेळी सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, महिला व बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. गंगाधर परगे आदींसह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका उपस्थित होत्या.
या पुरस्कारात पर्यवेक्षिका यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यांनी सन्मान चिन्ह व १० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. विशेष प्राविण्य मिळविलेल्या कु. डॉली पाटील यांना सन्मान चिन्ह व २० हजार रूपयांचे धनादेश देऊन सन्मानित केले. जागतिक पातळीवर तुमच्या कामाची दखल घेतली जाते. तुम्ही उत्तम काम करताय. वैवाहिक जिवनात स्वतःसाठी वेळ देण अवघड असलं तरी दर दिवसातील एक तास स्वतःसाठी द्या,असे आवाहन जिंदाल यांनी आशा, अंगणवाडी सेविका आदींना केले