प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचा पायी एल्गार मोर्चा
By नितीन पंडित | Published: February 23, 2023 07:37 PM2023-02-23T19:37:13+5:302023-02-23T19:39:08+5:30
अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वाखाली शहापूर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थाना पर्यंत पायी एल्गार मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भिवंडी : अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वाखाली शहापूर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थाना पर्यंत पायी एल्गार मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. भर उन्हात या पायी मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत.
अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, मानधनवाढ, दरमहा अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन,ग्रॅच्युईटी, सुसज्ज अंगणवाडी केंद्र, पूरक पोषण आहाराच्या दरात वाढ, कार्यक्षम मोबाईल व मराठी पोषण ट्रॅकर अॅप,सेवानिवृत्ती लाभ, इतर भत्ते, केंद्राचे भाडे, परिवर्तन निधी थकीत निधी देणे या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या असून त्यासाठी अंगणवाडी सेविका लढा देत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंग यांनी दिली आहे.
या एल्गार मोर्चात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी ब्रिजपाल सिंग, भगवान दवणे,गुलाब वरकुटे,अपर्णा पानसरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा पदयात्रा महिला मोर्चा गुरुवारी भिवंडी तालुक्यात दाखल झाला असून पडघा येथे दुपारच्या मुक्कामा नंतर रात्री दापोडा येथे मुक्काम करून शुक्रवारी हा मोर्चा सकाळी ठाण्यात धडकणार आहेत.