पोषण आहारची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची अंगणवाडी ताईंवर ओढावली आफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 02:08 AM2021-04-01T02:08:13+5:302021-04-01T02:08:21+5:30
गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके, आदींना पोषण आहार देण्यात येत आहे. या आहाराच्या लाभार्थ्यांसह संबंधित माहिती ऑनलाईन इंग्रजी भाषेत नोंदण्याची आफत अंगणवाडीसेविकांवर आली आहे.
ठाणे : गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके, आदींना पोषण आहार देण्यात येत आहे. या आहाराच्या लाभार्थ्यांसह संबंधित माहिती ऑनलाईन इंग्रजी भाषेत नोंदण्याची आफत अंगणवाडीसेविकांवर आली आहे. इंग्रजी भाषेच्या या माहितीसाठी या अल्पशिक्षित ताईंना आता सक्ती केली जात असल्यामुळे त्या राज्यस्तरीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
केंद्र पुरस्कृत पोषण अभियान कार्यक्रमांर्तगत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार पुरवठा केला जात आहे. या सेवांमध्ये सुधारणांसाठी व सेवांचे सनियंत्रण करण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करून केंद्र शासनाने माहिती संप्रेक्षण व तंत्रज्ञान आधारित पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशननी निर्मिती केली आहे. पोषण ट्रॅकर या ॲप्लिकेशनमध्ये गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची सक्ती केली आहे. यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे; पण आदिवासी, ग्रामीण व शहरी प्रकल्पात काम करणाऱ्या बहुसंख्य अंगणवाडीसेविकांचे शिक्षण मराठी भाषेत झाले, याशिवाय काही सेविका अल्पशिक्षित आहेत. त्यांना लाभार्थ्यांची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याची समस्या येत आहे.
महाराष्ट्र राज्यात शासनाची सर्व कामे मातृभाषेत केली जात आहेत. शासनाचे असे धोरण आहे की, राज्यात सर्व कामे मातृभाषेत केली पाहिजेत.
मात्र, अंगणवाडीसेविकांना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये पोषण आहाराची माहिती इंग्रजी भाषेत भरण्याचे संबंधित आयुक्तालयाने आदेश जारी केल्याने राज्यातील अंगणवाडीसेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासनाकडे दाद मागून इंंग्रजी भाषेत माहिती भरण्याची अट तत्काळ शिथिल करण्याची मागणी केली आहे.
nअन्यथा राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.