अंगणवाडी सेविका सोमवारी शासनाला मोबाइल करणार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:56+5:302021-08-21T04:45:56+5:30
ठाणे : मोबाइल २ जीबी रॅमचा आणि त्यात क्षमतेपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची ...
ठाणे : मोबाइल २ जीबी रॅमचा आणि त्यात क्षमतेपेक्षा जास्त लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप आदींची नोंद अंगणवाडी सेविकांना ठेवावी लागत आहे. हा मोबाइल नेहमी हँग होतो. तो लवकर गरम होतो. त्यामुळे या मोबाइलवर काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेविका २३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीन लाख मोबाइल शासनाला परत करणार आहेत.
सेविकांना दिलेला मोबाइल निकृष्ट असून ते आता जुने झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतात. त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन ते आठ हजार रुपये अंगणवाडी सेविकांकडून वसूल केले जात असल्याचा आरोप होत आहे. एक लाख मोबाइल मंगळवारी शासनाला परत केले आहेत. आता जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा जास्त मोबाइल सोमवारी जमा करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सेविकांनी दिला आहे.
केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप दिले आहे; मात्र शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये रॅम कमी पडत असल्यामुळे हे ॲप डाऊनलोड होत नाही. राजभाषा मराठी असताना इंग्रजीत ॲपमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे बेकायदेशीर असल्याचेही सेविकांचे म्हणणे आहे. या सेविकांचे नेतृत्व ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. एम. ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, दिलीप उटाणे, शुभा शमीम, भगवान देशमुख, कमल परुळेकर, जयश्री पाटील आदी पदाधिकारी करीत आहेत.