ठाणे जिल्हाधिाकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा; परिसर दणाणला
By सुरेश लोखंडे | Published: December 1, 2023 04:32 PM2023-12-01T16:32:23+5:302023-12-01T16:33:12+5:30
अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढून त्यांच्या प्रलंबित व आश्वासन देऊनही पुर्तता न झालेल्या मागण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले.
ठाणे : येथील महागिरी येथील संघटनेच्या कार्यालयाजवळून शासकीय विश्रामगृहापर्यंत जिल्ह्याभरातील हजाराे अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढून त्यांच्या प्रलंबित व आश्वासन देऊनही पुर्तता न झालेल्या मागण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. विविध घाेषणां देत सेविकांनी हा परिसर दणाणून साेडला प्रशासनाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी हा माेर्चा काढून प्रलंबित मागण्यांची मागणली लावून धरली. या संघाचे अध्यक्ष ॲड. एम. ए. पाटील,सरचिटणीस बृजपालाि सिंह, भगवान दवणे, राजेश सिंह, मुकुंद कदम आणि संगिता चाचणे आदींच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी धडक माेर्चा काढून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाला आश्वासनांची पुर्तता करण्याची आढवून करून दिली. यावेळी या माेर्चाच्या शिष्टमंडळाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालय कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासाठी निवेदन दिले.
येथील शासकीय विश्रामगृहासमाेरच्या चाैकात या सेविकांचा मार्चा आडवण्यात आला. त्यावेळी या माेर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी वाहतुकीचा काही अंशी खाेळंबा णला. एकात्मिक बालविकास सेवा याेजनेत कार्यरत असलेल्या या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनिसांनी या माेर्चात सहभाग घेतला. या मार्चाव्दारे त्यांनी सेविकांनी दरमहा दहा हजार रूपये, मिनी सेविकांना सात हजार आणि मदतनिसांना पाच हजार ५०० रूपये दरमहा मानधन मिळते. मात्र या अत्यल्प मानधनात शासनाने भरघोस वाढ करावी. कामासाठी लागणारे मोबाईल, छापिल रजिस्टर, अहवाल फॉर्म्स देण्यात यावे. कर्मचा-यांच्या मिळत असलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दरमहा देण्याचा निर्णय करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूईटी अॅक्ट लागू करून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचे पैसे द्या, मिनी अंगणवाडीचे रूपांतर नियमीत अंगणवाडीत करा आदी मागण्यांसाठी हा धडक माेर्चा सेविकांनी काढला हाेता.