अंगणवाडी सेविकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:44 AM2021-09-25T04:44:07+5:302021-09-25T04:44:07+5:30
ठाणे : विविध योजनांचे कामकाज करणाऱ्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी, अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी दुपारी देशपातळीवरील एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग घेऊन ...
ठाणे : विविध योजनांचे कामकाज करणाऱ्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी, अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी दुपारी देशपातळीवरील एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली.
येथील शासकीय विश्रामगृहाजवळ जिल्ह्यातील या सेविकांनी एकत्र येऊन मागण्यांसाठी निदर्शने करून केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधले. आजच्या या संपात ठाणे जिल्ह्यातील या शासकीय योजनांचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा, परिचारिका आदींनी सहभाग घेऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करून आंदोलन छेडल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे संस्थापक ॲड. एम ए. पाटील यांनी सांगितले. या संपाचे नेतृत्व पाटील यांच्यासह राज्य कर्मचारी संघाचे भास्कर गव्हाळे, अंगणवाडी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह, राजेश सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सेविकांचे आम्रपाली खरात, नीलम पाटील, संगीता चाचले आदींच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे पोस्टर घेऊन अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली. शासनाच्या विविध योजनांमधील या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून शासकीय कर्मचारी म्हणून ओळखण्यात यावे, या कर्मचाऱ्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षांचा लाभ मिळावा. एकात्मिक बाल विकास योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मनरेगा, सर्व शिक्षा अभियान या योजनांना कायम करावा, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक इत्यादी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा. या मागण्यांसाठी हा देशव्यापी लाक्षणिक संप करण्यात आला.
-------