विसजर्नस्थळावरील वाहन अडवणुकीमुळे गणेशभक्तांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:11+5:302021-09-14T04:47:11+5:30
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने गणरायाचे आगमन आणि विसर्जन सुरू झाले आहे. परंतु, कोपरी येथील चेंदणी ...
ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने गणरायाचे आगमन आणि विसर्जन सुरू झाले आहे. परंतु, कोपरी येथील चेंदणी कोळीवाडा बंदर (विसर्जन घाट) येथे बाप्पाच्या मूर्ती नेताना भाविकांची चांगलीच दमछाक हाेत आहे. विसर्जन घाटापासून सुमारे ३०० मीटर लांब अंतरावर भाविकांच्या हातगाड्या किंवा वाहने थांबवून विसर्जन सोहळ्याला मूर्तीसोबत दोन किंवा तीन भाविकांना पोलीस प्रवेश देत आहेत. मात्र, पावसात तर वजनदार मूर्ती नेताना भाविकांना त्रास होत आहे. अशातच एखादवेळी मूर्तीस काही बरे वाईट झाल्यास होणाऱ्या संभाव्य परिस्थिती पोलीस कशी हाताळतील, अशी शंका उपस्थित करून भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे गौरीगणपती विसर्जन सोहळ्यावेळी तरी मूर्ती हातातून नेण्याचे अंतर कमी करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.
विसर्जन घाट परिसरात भाविकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घेतली आहे. घाटावर बाप्पाची शेवटची आरती करण्यासाठी बंदी केली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरावर विसर्जनासाठी मूर्ती नेताना भाविकांची तारेवरची कसरत बघायला मिळत आहे. विसर्जनासाठी बाप्पाची मूर्ती घेऊन आलेली हातगाडी अथवा वाहने अष्टविनायक चौकात थांबवून मूर्तीसोबत केवळ दोन किंवा तीन व्यक्तींनाच पोलिसांकडून दिला जातो आहे. अशातच दीड दिवसांच्या बाप्पाचा विसर्जन सोहळ्याप्रसंगी मूर्ती विसर्जनासाठी घाटावर नेताना भाविकांची ओढाताण पहायला मिळाली. अशातच वरुणराजाची जोरदार बॅटिंग सुरू झाल्यास बाप्पाला हातात घेऊन चालणे अवघड जात होते. अष्टविनायक चौक ते विसर्जन घाट हे साधारण ३०० मीटरचे अंतर आहे. काही महिलादेखील बाप्पाच्या मूर्ती हातात घेऊन येत होत्या. हा त्रास वाचविण्यासाठी अष्टविनायक चौकातील भाविकांना थांबवून हातगाडी अथवा वाहनासोबत ठरावीक माणसांना ५० मीटर अंतरावर (एमएसईबी ऑफिस) वाहन न्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.