प्रेयसी सोबत येत नसल्याचा राग; चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीस नाशिक येथून अटक
By नितीन पंडित | Updated: April 4, 2023 16:33 IST2023-04-04T16:32:48+5:302023-04-04T16:33:20+5:30
पोलिसांनी गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

प्रेयसी सोबत येत नसल्याचा राग; चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या आरोपीस नाशिक येथून अटक
भिवंडी :दि.४- विवाहित प्रेयसीने मागील पाच वर्षां पासून प्रेमसंबंध असलेल्या प्रेमी सोबत जाण्यास नकार दिल्याने प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या चार वर्षीय चिमुरड्याचे घरा बाहेरून अपहरण करून गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रेमी आरोपीस नाशिक रेल्वे स्थानकात शांतीनगर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अवघ्या बारा तासात अटक केली आहे.
टेमघर येथील चाळीत राहणारे मोहम्मद अली फकीर व त्याची पत्नी आयशा बीबी आपल्या चार वर्षीय आशिक अली या मुलासह राहत असताना सोमवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांचा मुलगा घरा बाहेर आढळून न आल्याने त्याचा शोध घेऊन ही तो सापडला नसल्याने सायंकाळी सात वाजता चिमुरड्याची आई आयशा बीबी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलाच्या हरवल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याच दरम्यान मुलाच्या आई सोबत पाच वर्षां पासून प्रियकर असलेल्या एका इसमाने मोबाईल वर फोन करीत तुझा मुलगा माझ्या जवळ असून तू माझ्या सोबत राहायला ये असे सांगत न आल्यास मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती.त्यासाठी आरोपीने मुलाच्या आईस नाशिक येथे येण्याची गळ घातली.ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे ,पोहवा अनिल शिरसाठ, रिजवान सैय्यद,शांताराम चौरे,किरण मोहिते या पथकाने तातडीने पावले उचलत दोन पथक बनवून आरोपीचा शोध घेतला.
तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यासाठी मुलाच्या आई सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे या स्वतः रेल्वेने नाशिक येथे पोहचल्या.तेथील रेल्वे स्टेशन च्या ब्रिज वर आरोपी उभा असल्याचे आढळून आल्या नंतर महिला पोलीस अधिकारी मुक्त फडतरे यांनी मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळत अपहरण झालेल्या चिमुरड्याची सुटका करून अवघ्या बारा तासात या गुन्ह्याची उकल केल्याने पालकांसोबत पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.