ठाण्याच्या वर्तकनगर म्हाडा वसाहतीमध्ये दूषित पाण्यामुळे संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:10 PM2019-08-14T22:10:59+5:302019-08-14T22:25:52+5:30
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
ठाणे : वर्तकनगर प्रभागातील म्हाडा वसाहतीमधील इमारती तसेच बैठ्या घरांना गेल्या तीन आठवडयांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरक्षेसाठी या परिसरात ५० सार्वजनिक नळ द्यावेत, अशी मागणी जनता दलाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.
येथील वर्तकनगर, शिवाईनगर भागातील म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेच्या तानसा आणि वैतरणा या वाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या ते शुद्ध न करताच पुरवठा होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस वसाहत इमारत क्रमांक ५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ तसेच इतर इमारतींमधील सुमारे तीन हजार कुटुंबियांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच येथील नळांना मातीसारखे लाल गढूळ पाणी येत आहे. या दूषित पाण्याच्या प्रादूर्भावामुळे येथील नागरिकांना त्त्वचारोग, सर्दी, खोकला आणि तापाचे आजार वाढले आहेत. यात लहान मुले आणि वृद्धांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकालाच विकत पाणी घेणे शक्य नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी किमान ५० सार्वजनिक नळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने सुरोसे यांनी आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
‘‘ वर्तकनगर म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तानसा वाहिनीतून पाणी पुरविले जाते. सध्या ते वैतरणा वाहिनीवर वळविण्यात आले आहे. त्याला क्लोरिंगचा डोस दिला जात असला तरी ते शुद्ध होत नाही. जी नविन बांधकामे आहेत. त्याठिकाकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पण, जुन्या वसाहतीमध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याची समस्या आहे. पावसाळ्याचे काही दिवस ही समस्या राहील. त्यानंतर हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.’’
अतुल कुलकर्णी, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका
.......................