नाराज भाजप नगरसेवकांच्या बहिष्काराचा झाला ‘फियास्को’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:52 AM2019-04-02T03:52:03+5:302019-04-02T03:52:34+5:30
निवडणुकीत एकदिलाने काम करू : युतीच्या बैठकीत घेतली शपथ
ठाणे : भाजपच्या नाराज २३ नगरसेवकांनी अखेर पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे नमते घेत, सोमवारी झालेल्या युतीच्या बैठकीला हजेरी लावली. या निवडणुकीत एकदिलाने काम करू, अशी शपथही त्यांनी घेतल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत त्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा फियास्को झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ज्या गटनेत्यांनी यासाठी असंतुष्ट नगरसेवकांचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्यांनीच नांगी टाकल्याने त्यांच्या तंबूतील उर्वरित भाजप नगरसेवकांपुढे शरणागती पत्करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही.
शिवसेनेकडून राजन विचारे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या २३ नगरसेवकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दुसरा कोणताही उमेदवार दिल्यास त्यासाठी काम करण्याची आमची तयारी असल्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतली होती. भाजपचे गटनेते नारायण पवार, अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर यांनी या नाराज नगरसेवकांची मोट बांधली होती. रविवारी झालेल्या एका बैठकीला हे नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे सोमवारच्या बैठकीला ही मंडळी हजर राहणार का, असा सवाल उपस्थित झाला होता. परंतु, सोमवारची सकाळ उजाडताच हालचाली वेगात झाल्या. सर्व नगरसेवकांचे फोन खणखणू लागले. त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची तंबीच पक्षाकडून देण्यात आली. बैठकीला न आल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला. नाराज नगरसेवकांचे नेतृत्व गटनेते नारायण पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्व नगरसेवकांना बैठकीला आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच देण्यात आली होती.
असंतुष्टांची जबाबदारी पवारांवरच
सर्व नगरसेवक बैठकीला आले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा नाराज गटाचे नेतृत्त्व करणाऱ्या नारायण पवार यांना देण्यात आला होता. त्यामुळे पवार यांनी सर्व नगरसेवकांना फोन करून बैठकीला हजेरी लावण्याची गळ घातली. त्यानुसार, सर्व नगरसेवक बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत युतीच्या सर्वच नगरसेवकांनी विचारेंसाठी एकदिलाने काम करण्याचा नारा दिला आणि भाजपच्या नाराज नगरसेवकांचा फियास्को झाला. या २३ नगरसेवकांनी निवडणुकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते.
त्यांनी राजन विचारे यांच्या उमेदवारीविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद ठाणे लोकसभा मतदारसंघात निर्माण झाला होता. पक्षस्तरावर याची गंभीर दखल घेण्यात आली. मात्र हा वाद अखेर पेल्यातील वादळच ठरला आहे.