संतप्त दुकानदारांचा उल्हासनगर पालिकेवर मोर्चा , कारवाईचा निषेध : आयुक्तांशी वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:51 AM2017-10-14T02:51:53+5:302017-10-14T02:52:01+5:30
रस्ता रूंदीकरणातील बांधकाम कारवाईच्या निषेधार्थ दुकानदारांनी शुक्रवारी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त व दुकानदारांत वाद झाला.
उल्हासनगर : रस्ता रूंदीकरणातील बांधकाम कारवाईच्या निषेधार्थ दुकानदारांनी शुक्रवारी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आयुक्त व दुकानदारांत वाद झाला. दुकानदारांनी आयुक्तांवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पालिका व आयुक्तांविरोधात निवेदन दिले. वादामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
उल्हासनगरमधून जाणाºया अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे रूंदीकरण दोन वर्षापूर्वी झाले. रूंदीकरणात १ हजारापेक्षा अधिक व्यापारी बाधित झाले आहेत. पूर्णत: बाधितांना इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागेवर गाळे देण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केला. तसेच अंशत: बाधितांना दुरूस्तीची परवानगी तत्कालिन आयुक्त मनोहर हिरे यांनी तोंडी दिली. मात्र व्यापाºयांनी रूंदीकरणाच्या आड बहुमजली बांधकाम केले.
ज्या व्यापाºयांचे बांधकाम शुक्रवारी पाडले त्यांच्याकडे जुने दोन मजली दुकानाचे कागदपत्रे असून मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या आहेत.
कारवाईच्या निषेधार्थ संतप्त दुकानदारांनी पालिकेवर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या दालनात व्यापाºयांनी आपली व्यथा मांडली. तसेच रस्ता रूंदीकरणातील ८० टक्के व्यापाºयांनी दुरूस्ती व बहुमजली बांधकामे केली. मालमत्ता कराच्या पावत्या आहेत. तसेच जागा सनदची असूनही बांधकामावर कारवाई का? असा प्रश्न केला. नियमानुसार बांधकाम केले नसल्यास कारवाई होणार असे आयुक्तांनी सांगताच वाद झाला. आयुक्तांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ दुकानदारांनी मार्केट बंद केले होते.