युपीएससी ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१व्या स्थानावर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 16, 2024 07:03 PM2024-04-16T19:03:31+5:302024-04-16T19:08:11+5:30
प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत पहिल्या १०० जणांमध्ये ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१ व्या स्थानावर आहे तर समिक्षा मेहेत्रे ३०२ व्या क्रमांकावर आली आहे.
ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत पहिल्या १०० जणांमध्ये ठाणे शहरातील अनिकेत हिरडे ८१ व्या स्थानावर आहे तर समिक्षा मेहेत्रे ३०२ व्या क्रमांकावर आली आहे. अनिकेत टिकुजीनी वाडी आणि समीक्षा ही वसंतविहार येथे वास्तव्यास आहे. दोघांनी ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत दोघांनी प्रतिरुप मुलाखत दिली होती. हिरडे हे प्रोबेशनल आयपीएस आहेत तर समीक्षा ही सीए आहे.
कळव्यातील प्रशांत भोजणे यांनी ८४९ वा क्रमांक प्राप्त केला आहे. युपीएससीने वेबसाईटवर (https://upsc.gov.in/) हा निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये १ हजार १४३ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर झाले. आयपीएसच्या प्रशिक्षणासाठी हिरडे हे हैद्राबादला आहेत. मेहेत्रे आणि हिरडे या दोघांनीही आएएसला प्राधान्य दिले आहे. दोघांनी याचे श्रेय आई वडिल आणि स्वत:वरील आत्मविश्वासाला दिले आहे.