अण्णा हजारेंचे ठाण्यात उपोषण
By admin | Published: December 16, 2015 12:34 AM2015-12-16T00:34:14+5:302015-12-16T00:34:14+5:30
रखडलेली १२५ कोटींची देणी मिळावीत, कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी
ठाणे : रखडलेली १२५ कोटींची देणी मिळावीत, कोर्टाने आदेश देऊनही ६१५ कर्मचाऱ्यांना अद्यापही परिवहनने सेवेत सामावून न घेणे, यासह विविध मागण्यांसाठी परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ते २६ जानेवारीच्या मुहूर्तावर बंद पुकारून उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यापूर्वीही परिवहन कर्मचाऱ्यांनी वागळे आगारात वारंवार काम बंद आंदोलनाची हाक दिली होती. परंतु, आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन शमविण्यात आले होते. मात्र, परिवहन प्रशासन आणि महापालिकेने त्यांच्या तोंडाला पानेच फुसली आहेत. परिवहन सेवा महापालिकेचे अंग असतांनादेखील तिला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, वारंवांर केवळ आश्वासनाची केवळ खैरात दिली जाते, परंतु प्रत्यक्षात थकीत देणी, सहावा वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम, मेडीकल, प्रवास भत्ता आदींसह विविध स्वरुपाचे भत्ते मिळत नसल्याने यापूर्वी १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर बंदची हाक दिली होती. त्यांनंतर पाचव्या वेतन आयोगातील काही फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांची हाती पडली. परंतु उर्वरित सर्वच देणी अद्यापही परिवहन अदा करु शकलेली नाही. आजघडीला प्रत्येक कर्मचाऱ्याची ही थकीत देणी चार ते पाच लाखांच्या घरात गेली असून सेवेतील २३०० कर्मचाऱ्यांनी ती मिळावी म्हणून हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने, दोन वेळा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी येत्या २६ जानेवारीला हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
या संदर्भात उद्या दुपारी कर्मचारी महापौर आणि व्यवस्थापकांची भेट घेणार आहेत. या भेटीतून काही सार्थ झाले नाही तर मात्र हे आंदोलन अटळ असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला.
तसेच या बंद विषयीचे पत्र जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त आदींसह पोलीस प्रशासनालाही दिले आहे. हजारे यांनी या आंदोलनाला पाठींबा देण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांना हे आंदोलन यशस्वी होईल, अशी खात्री वाटत आहे.