ऐन दिवाळीत एटीएम फोडून १८ लाखांची रोकड चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 08:21 PM2018-11-06T20:21:34+5:302018-11-06T20:24:31+5:30
भिवंडी : तालुक्यातील कोनगांव येथील अजित पेट्रोल पंपालगत असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून ...
भिवंडी: तालुक्यातील कोनगांव येथील अजित पेट्रोल पंपालगत असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून दरोडेखोरांनी १८ लाख ६९ हजार ५०० रु पयांची रोकड लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.अशाच प्रकारे एटीएम फोडल्याची दुसरी घटना आहे. या घटनेने पोलीसांनी आव्हान निर्माण केले आहे.
भिवंडी - कल्याण मार्गावरील कोनगांव येथे स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकेचे एटीएम असून चोरांनी एटीएम मधील सिसिटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यामधील १७ लाख ६९हजार ५०० रु पयांची रोकड लुटून पोबारा केला आहे. आज सकाळी एटीएम मशीनवर एक ग्राहक पैसे काढण्यासाठी आला असता ही घटना निदर्शनास आली. कोनगांव पोलीस ठाण्यास या घटनेची माहिती कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला.या प्रकरणी एटीएम कंपनीचे कर्मचारी सिद्धार्थ सूर्यवंशी यांनी या घटनेबाबत कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दहा दिवसांपुर्वी भिवंडी-वसई मार्गावर अंजूरफाटा येथील शिवाजीनगर मधील युनियन बँकचे एटीएम अशाच प्रकारे चोरट्यांनी फोडून दहा लाख रूपयांची चोरी केली होती. वास्तविक एटीएमच्या ठिकाणी रखवालदार नसल्याने अशा घटना घडत असल्याची माहिती पोलीस सुत्राने दिली.