पालिकेची आर्थिक दिवाळखोरी जाहीर करा, श्वेतपत्रिका काढा, विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्तांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 05:49 AM2017-09-14T05:49:21+5:302017-09-14T05:49:47+5:30
केडीएमसीची खालावणारी आर्थिक परिस्थिती व वाढती विकासकामे व आस्थापनेवरील खर्च, तसेच दिवसेंदिवस घसरत चाललेला उत्पन्नाचा आलेख याची एकंदरीत माहिती नागरिकांसमोर उघड होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आर्थिक दिवाळखोरी जाहीर करून श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कल्याण : केडीएमसीची खालावणारी आर्थिक परिस्थिती व वाढती विकासकामे व आस्थापनेवरील खर्च, तसेच दिवसेंदिवस घसरत चाललेला उत्पन्नाचा आलेख याची एकंदरीत माहिती नागरिकांसमोर उघड होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आर्थिक दिवाळखोरी जाहीर करून श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
केडीएमसीला अपेक्षित उत्पन्न होऊ शकलेले नाही, अशी थातूरमातूर कारणे देत पालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमधील नागरी विकासकामांना खो घालण्यात येत आहे. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला बळी पाडण्याचे काम सध्या प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, हे नागरिकांसमोर येण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे हळबे यांचे म्हणणे आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक हे फुगवलेले आहे. वारंवार मागणी करूनही आठमाही अंदाजपत्रक सादर केलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सत्ताधाºयांनी अंदाजपत्रक फुगवले व प्रशासनाने सत्य समोर आणलेच नाही, असे आरोप-प्रत्यारोप आता दोन्ही बाजूंनी करण्यात येत आहेत. मात्र, खालावलेल्या आर्थिक परिस्थितीची जबाबदारी कोणीही घेत नाही. सत्ताधाºयांच्या दबावापुढे सत्य परिस्थिती दाखवून देण्यात असमर्थ ठरलेले महापालिका प्रशासन यापुढे नागरिकांना दररोज भेडसावणाºया विविध नागरी समस्यांचे निराकरण कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक प्रकल्प एकतर बंद होण्याच्या मार्गावर आहेत, अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत आणि नव्याने प्रकल्प हाती घेणे आर्थिक कुवतीस परवडणारे नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे हळबे म्हणाले.
...तर आंदोलनाची वेळ
कचºयाचा प्रश्न, आरोग्यविषयक समस्या, पाणीपुरवठा प्रश्न, जीवघेणे खड्डे, कोलमडलेली परिवहन सेवा, प्रदूषित हवा, अशा एक ना अनेक समस्या आजही कायम आहेत. या कामांचे कंत्राटदार कामाची देयके मिळत नसल्याने त्रस्त आहेत. काही कामे सोडण्याच्या मार्गावर आहेत, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
महापालिका क्षेत्रातील करदात्या नागरिकांना सत्ताधाºयांनी पांघरलेल्या झुलीच्या वास्तवाचे दर्शन व्हायलाच पाहिजे. त्यासाठी केडीएमसीच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दर्शवणारी श्वेतपत्रिका तातडीने काढावी. टाळाटाळ केल्यास नाइलाजाने नागरिकांसोबत नागरी हितासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा हळबे यांनी पत्रात दिला आहे.
याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला झाला नाही.