खंडणी मागणाऱ्याचे नाव जाहीर करा; काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:38 AM2019-11-01T00:38:03+5:302019-11-01T00:38:10+5:30
गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांना केले आवाहन
डोंबिवली : गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्यांचे नाव त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष केणे आणि प्रदेश सचिव जोजो थॉमस यांनी केली. हा खंडणीखोर कुणी राजकीय नेता आहे की माफिया ते उघड झालेच पाहिजे, असेही ते म्हणाले.
पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील गुडविन ज्वेलर्सच्या बंद दुकानासमोर गुरुवारी संध्याकाळी शेकडो ग्राहक जमले होते. त्या ग्राहकांची केणे आणि थॉमस यांनी भेट घेतली. तसेच काँग्रेस गुंतवणूकदारांसोबत असल्याचा विश्वास दिला. सर्वसामान्यांचा कष्टाचा पैसा परत मिळवून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गुडविन ज्वेलर्सचे संचालक व्हिडीओद्वारे आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप करतात. मात्र तरीही पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडू शकत नाहीत हे काय गौडबंगाल आहे, असे केणे म्हणाले. सत्ताधारी भाजप सत्ता स्थापन करण्यात मश्गुल असून सामान्य गुंतवणूकदार वाºयावर सोडला असल्याचे काही भान नाही, असे केणे म्हणाले. गुडविनचे गुंतवणूकदार तसेच नोकरीची शाश्वती नसलेले कर्मचारी यांच्याशी भाजप व शिवसेनेला काही देणे-घेणे नाही. गुडविनच्या मालकांना खंडणीसाठी धमकी देणारे राजकीय नेते किंवा माफिया कोण, हा प्रश्न धसास लागणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी त्याकरिता काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.
आगामी काळात ठाणे, वाशी, चेंबूर या सर्व ठिकाणी असलेल्या गुडविनच्या ग्राहकांना एकत्र करुन लढा उभारण्यात येणार असल्याचे थॉमस यांनी सांगितले.