'पाणी दलालांमुळे शहरात तणाव निर्माण होण्याची भीती'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:35 PM2019-05-13T16:35:41+5:302019-05-13T16:39:10+5:30
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे. ठाण्यात सक्रीय असलेल्या टँकर लॉबीमुळेच धरणाचा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावत नाहीत.
ठाणे - ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे. ठाण्यात सक्रीय असलेल्या टँकर लॉबीमुळेच धरणाचा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावत नाहीत. पाणी सोडणारे व्हॉल्व ऑपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करीत आहेत. त्यामुळे ठाणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशी भीती व्यक्त करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.
ठाणे शहरातील नालेसफाई आणि पाणीटंचाईच्या बाबतीत आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शहरातील नालेसफाईचा गोंधळ आणि पाणी वाटपातील भ्रष्टाचाराचा पंचनामा केला. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक महेश साळवी आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, एरवी पाण्यासाठी आरडाओरड केवळ गरीबांच्या चाळीतून अन् झोपडीतूनच केली जाते, असा दावा करणार्यांना या पत्रकार परिषदेमध्ये हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू सोसायटीच्या सेक्रेटरी अर्चना वैद्य यांनी चपराक लगावली. यावेळी त्यांनी, वर्षाचे बारा महिने आणि 24 तास पाण्याची टंचाई भेडसावत असून टँकरशिवाय पर्यायच नसल्याचे जितेंद्र आव्हाड आणि उपस्थित पत्रकारांना सांगितले.
आव्हाड म्हणाले, ठाण्यात सध्या सत्तेवर असलेल्या पक्षाचे राजकीय पुढारी पाण्याचा खेळ खेळत आहेत. स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला असून दिवा, मुंब्रा, कळवा, नौपाडा, वागळे, घोडबंदर आदी सर्वच भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक ठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. 25 वर्षांच्या सत्तेत पाणी कुठे मुरले, हे सत्ताधार्यांनी जाहीर करावे. सध्या ठाण्यात टँकर लॉबी कामाला लागलेली आहे. हे टँकर कोणाचे आहेत, याची चौकशी करण्यात आली पाहिजे. सध्या ज्या धरणांचे पाणी ठाणेकरांना मिळत आहे. त्या धरणांमध्ये 18 ते 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जर, ठाणे पालिकेचे स्वत:च्या मालकीचे धरण असते तर ही वेळच आली नसती. मात्र, पाण्याच्या वाटपावर काहीजणांची दैनंदिनी चालत आहे; त्यातून त्यांच्या नेत्याला हप्ते मिळत आहेत. त्यामुळेच धरण बांधले जात नाही. म्हणूनच ज्या आयुक्तांनी ठाणे शहरात अनेक सुंदर कामे केली आहेत. त्या आयुक्तांनीच आता पुढाकार घेऊन मेट्रो- अंतर्गत मेट्रो असे हजारो कोटींचे प्रकल्प एक-दोन वर्षांसाठी बाजूला सारुन पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे; या पुढे ठामपाच्या मालकीच्या धरणाचे काय झाले, याचा जाब सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला विचारला पाहिजे. राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक येत्या महासभेत धरणाचे काय झाले, हे विचारणार असून जर अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर एकही महासभा होऊ देणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.
एकच अधिकारी 10 वर्षे सांभाळतोय नालेसफाई
भाजपाचे संजय केळकर यांनी ठाणे शहरातील नालेसफाईमध्य मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. संजय केळकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आणावेत. जर, एका आंब्याच्या स्टॉलला हटवण्यासाठी मुख्यमंत्री मध्यस्थी करीत असतील तर लोकांच्या जीविताशी संबधीत असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे. नाल्यातून निर्माण झालेला पैसा कुठे जातो, हे केळकर यांनी शोधावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.
गेली 10 वर्षे आम्ही नालेसफाई व्यवस्थीत व्हावी, या उद्देशाने पत्रव्यवहार करीत आहोत. ठामपा हद्दीतील नालेसफाईचे कामही रेंगाळले आहे. एकच अधिकारी गेले 10 वर्षे नालेसफाईवर लक्ष ठेवून आहे. नालेसफाईचे काम करणारे ठेकेदार कोणाच्या रोजंदारीवर आहेत; नालेसफाईवर गेली 25 वर्षे सत्तेत असलेले लोक का बोलत नाहीत, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करुन नालेसफाईसंदर्भात मागील वर्षी मांडलेली लक्ष्यवेधी आजपर्यंत सभागृहात घेण्यात येत नाही, याची कारणे आता सत्ताधारी आणि प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली.