वांगणी टर्मिनल म्हणून जाहीर करा; प्रवासी संघटनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 12:25 AM2019-06-01T00:25:46+5:302019-06-01T00:26:00+5:30
गेल्या काही वर्षांपासून वांगणीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वांगणी रेल्वेस्थानकावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरू आहेत
अंबरनाथ : वांगणी हे टर्मिनल म्हणून जाहीर करावे तसेच वांगणी यार्डाचे विस्तारीकरण करून कर्जत दिशेला आवश्यक त्याठिकाणी क्रॉसओव्हरची व्यवस्था करून यार्डातील सर्व लोकल वांगणी- सीएसएमटी करण्यात याव्यात, अशी मागणी वांगणी प्रवासी संघटना व उपनगरीय प्रवासी महासंघाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून वांगणीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वांगणी रेल्वेस्थानकावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे या भागात येत्या पाच वर्षांत १५ ते २० हजार सदनिका तयार होणार असल्याने प्रवासीसंख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यातच कर्जत, खोपोलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल अपुºया असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी नाइलाजास्तव यार्डातील लोकलने प्रवास करतात. त्यातून वांगणी व बदलापूरच्या प्रवाशांमध्ये संघर्ष होत आहे. हा संघर्ष परवडणारा नाही, याची जाणीव असल्यामुळे वांगणी प्रवासी संघटनेने सातत्याने यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
यार्डातील लोकल वांगणी-मुंबई करण्याची मागणी केली आहे. खासदार कपिल पाटील यांनीही मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्राद्वारे वांगणी-मुंबई लोकल सुरू करण्याबाबत कळवले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य व वांगणी प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली. वांगणी टर्मिनल स्टेशन तत्काळ करावे, या मागणीसाठीची पत्रे शेलार तसेच प्रवासी महासंघाचे वरिष्ठ सल्लागार अॅड. दत्तात्रेय गोडबोले यांनी रेल्वे प्रशासनास सादर केली असून खासदार कपिल पाटील यांची लवकरच मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या काही वर्षांत बदलापूर-वांगणी महापालिका होऊ शकते. त्यामुळे वांगणी टर्मिनल हे बदलापूर व नव्याने होणाºया कासगाव या दोन्ही स्थानकांना फायद्याचे होणार आहे.
वांगणी स्थानकात सर्व सुविधा
वांगणी स्थानकात सायडिंग लाइन्स, मोटारमन रनिंग रूम उपलब्ध आहेत. त्यामुळे जादा मोटारमन, जादा लाइन्स व जादा लोकलपैकी कशाचाही भार न पडता वांगणी टर्मिनल अस्तित्वात येणार असल्याचा दावाही शेलार यांनी केला आहे. रेल्वेच्या मुंबई विभागाचे परिचालन प्रबंधक शिवाजी सुतार यांनीही प्रवासी संघटनेच्या चर्चेत वांगणी टर्मिनल करता येईल, असे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.