ठाण्यातील सिद्धी गुप्ताच्या नातेवाईकांना महावितरणकडून अखेर पाच लाखांची मदत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:32 PM2018-04-04T21:32:06+5:302018-04-04T21:33:41+5:30

सिद्दी गुप्ताचा वीजेच्या धक्क्यामुळे रविवारी मृत्यु ओढवला. शिवसेनेसह परिसरातील रहिवाशांनी नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर तिच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याचे महावितरणच्या अधिका-यांनी जाहीर केले.

 Announcing the release of five lakhs from MSEB to relatives of Siddhi Gupta in Thane | ठाण्यातील सिद्धी गुप्ताच्या नातेवाईकांना महावितरणकडून अखेर पाच लाखांची मदत जाहीर

विजेच्या धक्क्याने रविवारी झाला होता मृत्यु

Next
ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवरही होणार निलंबनाची कारवाईविजेच्या धक्क्याने रविवारी झाला होता मृत्युलोकमत इफेक्ट

ठाणे : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे लोकमान्यनगर येथील मृत पावलेल्या सिद्दी गुप्ता (७) या मुलीच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत देण्याबरोबरच यातील दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणच्या ठाण्यातील अधिका-यांनी दिले. ओवळा माजीवडयाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या मागणीनंतर त्यांनी हे आश्वासन दिले.
टेमकर चाळीतील तिसरी मध्ये शिकणा-या सिद्धी हिला रविवारी महावितरणच्या उघडया वाहिन्यांमुळे वीजेचा धक्का बसला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु ओढवला. ‘महावितरणच्या हलगर्जीमुळे ठाण्यामध्ये चिमुकलीचा मृत्यु’ या मथळयाखाली ‘लोकमत’ हॅलो ठाणेच्या ४ एप्रिलच्या अंकात याबाबतचे सविस्तर वृत्तही प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, बुधवारी महावितरणच्या या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज महावितरणच्या सावरकरनगर येथील कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच या मुलीच्या पालकांना पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याची तसेच संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत महावितरणचे ठाणे मंडळ अधीक्षक अभियंता संतोष वहाणे आणि वागळे इस्टेट विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव चौधरी यांनी सिद्धीच्या पालकांना एक महिन्याच्या आत पाच लाखांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच संबंधित दोषी कर्मचारी अधिका-यांवरही कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने गेल्या अनेक वर्षापासून लोकमान्यनगर परिसरातील उघडया अवस्थेतील वीज वाहिन्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणारे जुने गंजलेले विद्युत पोल्स हटविण्यात यावेत, अशी मागणीही सरनाईक यांनी केलेली आहे. या मागणीलाही महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शॉक प्रूफ विद्युत बॉक्स या परिसरात बसवून जुने विद्युत पोल हटवावेत. तसेच महापालिकेकडे मागणी करून उपलब्ध जागेत भूमिगत केबल सह चांगल्या प्रतीचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत, झोपडयांवरुन गेलेल्या विद्युत वाहिन्या दुर्घटना होणार नाहीत, अशा ठिकाणी स्थलांतरीत कराव्यात, नवीन सदोष वीज मीटरची तपासणी करून मगच योग्य वीज बिले नागरिकांना पाठवावीत, आदी मागण्यांचेही निवेदन सरनाईक यांनी यावेळी दिले. यातील बहुतांश मागण्याही महावितरणने तात्काळ मान्य केल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
यावेळी युवसेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक, दिलीप बारटक्के, नगरसेविका आशा डोंगरे, कांचन चिंदरकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय नलावडे, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, उपशहर संघटक भाई खाडे, युवसेना समन्वयक संदिप डोंगरे तसेच शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

Web Title:  Announcing the release of five lakhs from MSEB to relatives of Siddhi Gupta in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.