कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:38 AM2021-05-15T04:38:18+5:302021-05-15T04:38:18+5:30
ठाणे : केंद्र सरकारने आता कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर तीन ते चार महिन्यांपर्यंत वाढवले असून, तसा बदल ...
ठाणे : केंद्र सरकारने आता कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर तीन ते चार महिन्यांपर्यंत वाढवले असून, तसा बदल कोविन ॲपमध्येही केला आहे. परंतु, त्याचा फटका शुक्रवारी ठाण्यातील विविध केंद्रांवर दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सहन करावा लागला. अनेकांना डोस न घेताच पुन्हा घरची वाट धरावी लागली. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिकेने शुक्रवारी ३३ केंद्रांवर लसीकरण मोहीम हाती घेतली होती. यातील एका केंद्रावर केवळ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस, तर इतर केंद्रांवर ४५ वयावरील नागरिकांसाठी पहिला व दुसरा डोस दिला जात होता. मात्र, अनेक ठिकाणी दुसऱ्या डोससाठी नागरिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. परंतु, केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी ठामपा प्रशासनाने सुरू केल्याने अनेकांना लस न घेताच घरी परतावे लागले.
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर तीन ते चार महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने कोविन ॲपमध्ये तसे बदल केले आहेत. या बदलानुसार कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ४२ दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या नागरिकांची कोविन ॲपमध्ये नोंदणी होत आहे. त्यामुळे अशाच नागरिकांचे पालिकेने लसीकरण केले, तर कालवधी पूर्ण न झालेल्या नागरिकांना पुन्हा घरी पाठविले. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लस न मिळालेल्या नागरिकांचे यामुळे हाल झाले. दुसरीकडे कोविन ॲपमधील नोंदणीशिवाय नागरिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळू शकत नाही.
दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसच्या अंतरामध्ये मात्र कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिनचे पूर्वीप्रमाणेच लसीकरण सुरू आहे, असे ठामपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
-------
कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी आधी २८ दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतर तो ४२ दिवसांचा करण्यात आला. आता केंद्र सरकारने पुन्हा निर्णयात बदल करून तो ८४ दिवसांचा केला. कोविन ॲपमध्येही तशा प्रकारचे बदल केले असल्याने नागरिकांना शुक्रवारी लस मिळू शकलेली नाही. त्यामुळे लस कमी आहेत, किंवा त्यांचा साठा न आल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे का, तसे असल्याचे त्यांनी तसे जाहीर करावे.
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे
------------