त्रासदायक सुशोभीकरण पालिकेनेच तोडले; आठ कोटींचा केला होता खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 11:15 PM2021-03-25T23:15:35+5:302021-03-25T23:15:55+5:30
महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर भाईंदर पश्चिमेस तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभिकरणाचे कंत्राट दिले होते.
मीरा रोड : भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर अरुंद व वर्दळीचा असताना त्याठिकाणी आठ कोटी रुपये खर्च करून केलेल्या सुशोभिकरणामुळे पादचाऱ्यांचे हाल होत असल्याने व वाहतूककोंडी होत असल्याने अखेर काहीअंशी तोडून टाकण्यात आले. यामुळे पादचारी व प्रवाशांना दिलासा लाभला. ‘लोकमत’ने गेले वर्षभर हा विषय लावून धरला होता.
सत्ताधाऱ्यांच्या व काही नगरसेवकांच्या मागण्यांवरून नागरिकांचे हित न पाहताच केलेल्या सुशोभिकरणावरील कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम व पूर्वेला प्रचंड मोठ्या संख्येने प्रवाशांची आणि वाहनांची वर्दळ असते. त्यात येथील रस्त्यांवर बेकायदा फेरीवाल्यांचे अतिक्रमण असते.
महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर भाईंदर पश्चिमेस तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभिकरणाचे कंत्राट दिले होते. या सुशोभिकरणात पायवाट बंद केली होती. रस्ता, रेल्वेचे जिने, तिकीट घर याचा समतोल न राखताच पाच फुटापेक्षा जास्त उंचीचा पाया बांधला. मिठागरे विभागाच्या जागेत पालिकेने बळजबरीने बांधकाम केले. त्यामुळे रेल्वे पुलावर तसेच तिकीट खिडकीकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू होते. या कामामुळे रेल्वेच्या मधल्या जिन्याकडे ये-जा करण्याचा मार्ग चिंचोळा झाला. येथे प्रचंड वाहतूककोंडी होत होती.
‘लोकमत’ने गेल्यावर्षी या समस्येला वाचा फोडताना, पालिकेचा मनमानी, भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यावरून आमदार गीता जैन, सत्यकाम फाैंडेशनचे कृष्णा गुप्ता आदींनी तक्रारी करून प्रशासनाला धारेवर धरले. खासदार राजन विचारे यांनीसुद्धा प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला चांगलेच झापले होते .
नवीन आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिकेच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी आणि प्रवाशांच्या त्रासाचा आढावा घेतला होता. वाहतूक पोलिसांनी पालिकेच्या कामामुळे होणाऱ्या कोंडीबद्दल पत्र दिले होते. पालिकेने मधल्या रेल्वे जिन्यांकडे जाणारे मिठागर विभागाच्या जागेतील सुशोभिकरणाचे बांधकाम पूर्णपणे तोडून टाकले. हा मार्ग पुन्हा प्रवाशांसाठी मोकळा झाला. खा. विचारे व आ. जैन यांचे प्रवाशांसह प्रवासी संघटनांनी आभार मानले.