मुंबईतून आणखी ३७ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत
By जितेंद्र कालेकर | Published: November 22, 2020 05:08 PM2020-11-22T17:08:17+5:302020-11-22T17:15:14+5:30
ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुजफ्फर पावसकर याच्या मुंबईतील अंधेरी मरोळ नाका येथील घरातून शंभर आणि दोनशे रुपयांच्या ३७ हजार ७०० रुपयांच्या आणखी बनावट नोटा २० नोव्हेंबर रोजी हस्तगत केल्या आहेत. चौघांकडून आतापर्यंत ११ लाख ८६ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कर्ज फेडण्यासाठी मुंब्य्रातील घरातच भारतीय बनावटीच्या चलनी नोटा छापून त्या वटविणाऱ्या मुजमिल मोहंमद साल्हे सुर्वे (४०, रा. मुंब्रा) याच्यासह चौघांकडून आणखी ३७ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा ठाणे खंडणी विरोधी पथकाने जप्त केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्याकडून ११ लाख ८६ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील दत्त पेट्रोलपंपाजवळ बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या सुर्वे याच्यासह मुजफ्फर शौकत पावसकर (४१), प्रवीण परमार (४३) आणि नसरीन काझी (४१) या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने दोनशे, पाचशे आणि दोन हजारांच्या नविन बनावट नोटांसह १८ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस अंमलदार संजय भिवणकर, सत्यवान सोनवणे, सुरेश मोरे, अंकुश भोसले, कल्याण ढोकणे, सुभाष तावडे आणि रुपेश नरे आदींच्या पथकाने बनावट गिºहाईकाच्या मदतीने ही कारवाई केली होती. त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. कोठडीतील चौकशीमध्ये याच पथकाने पावसकर याच्या मुंबईतील अंधेरी मरोळ नाका येथील घरातून शंभर आणि दोनशे रुपयांच्या ३७ हजार ७०० रुपयांच्या आणखी बनावट नोटा २० नोव्हेंबर रोजी हस्तगत केल्या आहेत. नोटांच्या छपाईसाठी उपयोगात आणलेला स्कॅनर तसेच एका नामांकित कंपनीचा बॉन्ड पेपरही त्यांच्याकडून जप्त केला आहे. चौघांपैकीच एकाने या नोटांपैकी ४५ हजार रुपये चलनात वटविले आहेत. त्यातील एकाकडे दूध खरेदी केली होती. तो साक्षीदार पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्यांनी या बनावट नोटा घेतल्या ते आणखी दोन आरोपीही यात निष्पन्न झाले आहेत. त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. त्यांनी दहा हजारांमध्ये ४० हजारांच्या शंभर आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा विकत घेतल्या होत्या, अशीही माहिती तपासामध्ये समोर आली आहे. या चौघांच्याही पोलीस कोठडीत वाढ केली असून त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शनिवारी दिले आहेत. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.