कंत्राट देण्याच्या नावाखाली ३२ लाखांची फसवणूकीतील आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:00 AM2020-12-18T00:00:13+5:302020-12-18T00:02:49+5:30
अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील विनोद कोरगप्पा शेट्टी (३९) याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील जगदीप दुबे यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील विनोद कोरगप्पा शेट्टी (३९, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा तसेच त्याचा साथीदार विनोद याच्यासह पाच जणांनी दुबे यांना अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे अमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून ३२ लाख रु पये घेतले. प्रत्यक्षात दुबे यांना अशा प्रकारचे कोणतेही कंत्राट त्यांनी मिळवून दिले नव्हते. त्यांच्या पैशांचा अपहार करु न त्यांची फसवणूक झाली होती. याच प्रकरणात खंडणी विरोधी पथकाने आधी १२ डिसेंबर रोजी रोहित याल अटक केली. त्यापाठोपाठ आता १६ डिसेंबर रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत बुरके, संदीप भांगरे आणि महेश साबळे आदींच्या पथकाने विनोदलाही लोकमान्यनगर भागातून अटक केली. त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यातील अन्यही आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.