बोगस आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:12+5:302021-05-20T04:44:12+5:30
ठाणे : स्राव न घेताच केवळ आधारकार्डवर कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा बोगस निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटमधील संकपाल धवने (वय ३४, ...
ठाणे : स्राव न घेताच केवळ आधारकार्डवर कोरोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीचा बोगस निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटमधील संकपाल धवने (वय ३४, रा. सम्राटनगर, मुंब्रा, ठाणे) या आणखी एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचने बुधवारी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी आधी ठाणे महापालिकेच्या वाडिया रुग्णालयातील अफसर मंगवाना या वॉर्डबॉयला मंगळवारी (दि. १८) अटक केली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने टेंभीनाका येथील वाडिया रुग्णालयात १८ मे रोजी सापळा रचून मंगवाना याला अटक केली. ठामपाच्या आरोग्य विभागातील काही कर्मचारी हे कोणत्याही व्यक्तीचा स्राव न घेताच एक हजार २५० रुपयांच्या बदल्यामध्ये आधारकार्ड घेऊन ठाणे महापालिकेच्या लॅबचा खोटा निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट देत असल्याची माहिती ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडून घोडके यांना १४ मे रोजी मिळाली होती. याची खातरजमा करण्यासाठी एका बनावट ग्राहकामार्फत कोरोनामुळे मृत पावलेल्या दोन व्यक्तींचे आधारकार्ड असेच बनावट रिपोर्ट मिळविण्यासाठी पाठविण्यात आले. त्यासाठी १८ मे रोजी मंगवाना या वॉर्डबॉयच्या बँक खात्यात त्याच्या मागणीप्रमाणे अडीच हजार रुपये जमा केले. त्यानंतर असा बनावट आरटी-पीसीआर रिपोर्ट देतानाच मंगवाना याला मंगळवारी, तर संकपाल याला बुधवारी सकाळी अटक केली. त्यांच्याकडून हे बनावट आरटीपीसीआर रिपोर्टही जप्त केले आहेत. दोघांनाही २७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
..........................
दोघेही पालिकेत कंत्राटी कामगार
कोरोनाचे बनावट रिपोर्ट देणारे हे दोघेही आरोपी ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने परिचर म्हणून काम करतात. अफसर हा वॉर्डबॉय असून संकपाल हा बाईक रुग्णवाहिकाचालक म्हणून काम करतो. स्राव गोळा करण्याचेही काम त्याच्याकडे होते. एखाद्याला काही कारणास्तव निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्टची गरज असल्यास त्यांच्याकडून ते एक ते दीड हजारांची रक्कम घेऊन कोणताही स्राव न घेताच केवळ आधारकार्डवर कोविड सेंटरवर स्राव न घेतलेली स्वॅबस्टिक तपासणीसाठी लॅबमध्ये जमा करीत असत. त्यावर कोणताही स्वॅब नसल्यामुळे तपासणीमध्ये निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट लॅबमधून प्राप्त होत होता. हाच रिपोर्ट घेऊन मोफत होणाऱ्या चाचणीचे पैसे घेऊन शासकीय यंत्रणेचीही ते फसवणूक करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.