गावठी बॉम्ब प्रकरणात रायगड जिल्ह्यातून आणखी एक अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:15 AM2018-03-29T05:15:10+5:302018-03-29T05:15:10+5:30
रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा मोठा साठा ठाणे पोलिसांनी शनिवारी शीळफाटा परिसरातून हस्तगत केला
ठाणे : रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा मोठा साठा ठाणे पोलिसांनी शनिवारी शीळफाटा परिसरातून हस्तगत केला. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील आणखी एका आरोपीस पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी शनिवारी गावठी बॉम्बचा मोठा साठा हस्तगत केला. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील रेवसजवळ असलेल्या नौखार मोरपाडा येथील प्रवीण पाटील (३४) याला अटक करून त्याच्याजवळून २ लाख ३२ हजार रुपयांचे २९० गावठी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले होते. शीळ-डायघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या चौकशीतून त्याने बॉम्बचा साठा रायगड जिल्ह्यातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया नारंगी आदिवासी पाड्यातून रमेश पवार (५०) याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. गावठी बॉम्ब बनवण्यासाठी फटाक्यांमधील स्फोटक पदार्थाचा वापर केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने आरोपीला २०० रुपये प्रतिनग याप्रमाणे बॉम्ब पुरवले होते. पवारकडून २९० गावठी बॉम्ब आरोपीने अलिबाग येथून शीळफाट्यापर्यंत बसने आणल्याचेही समोर आले आहे.