ठाण्यातील सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी एका दलालास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:53 PM2021-06-04T23:53:04+5:302021-06-04T23:55:30+5:30
ठाण्यातील एका उच्चभ्रू निवासी गृहसंकुलातच मॉडेलिंग आणि सिने अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी सचिन सोनी (३५, रा. गोरेगाव, मुंबई) या आणखी एका दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील एका उच्चभ्रू निवासी गृहसंकुलातच मॉडेलिंग आणि सिने अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी सचिन सोनी (३५, रा. गोरेगाव, मुंबई) या आणखी एका दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्यालाही ७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील पाचपाखाडीतील एका गृहसंकुलात हसीना मेमन ही महिला तिच्या स्वीटी (घर मालकीण) या भागीदार महिलेसह हा ‘उद्योग’ गेल्या चार ते पाच महिन्यांपासून करीत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांच्या पथकाने सचिनसह चौघांना अटक केली आहे. या टोळीच्या तावडीतून दोन दाक्षिणात्य अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. दोन दाक्षिणात्य चित्रपटांसह दोन हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमीकाही गाजलेल्या आहेत. छानछौकी जीवनशैलीची सवय लागल्यामुळे पैशांची निकड भासू लागल्यामुळेच सचिन सोनी आणि सुनिलकुमार जैन या दलालांच्या जाळयात त्या अडकल्याचे तपासात समोर आले आहे. २ जून रोजी अटक केलेल्या सुनिलकुमारसह तिघांच्या संपर्कात सचिन सोनी होता. तो ठाण्यातील उर्जिता हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यालाही ३ जून रोजी अटक करण्यात आली.
* पतीचे निधन, मुलगी विकलांग-
या सेक्स रॅकेट प्रकरणात अटक केलेल्या घरमालकीण स्वीटी हीची मुलगी विकलांग असून पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरात कमवती व्यक्ती कोणीच नाही. तिच्या वडिलांच्या मालकीचा पाचपाखाडीतील टू बेडच्या फ्लॅटमध्ये ती वास्तव्याला होती. तिचा हाच फ्लॅट मोठया पैशांच्या मोबदल्यात या सेक्स रॅकेटसाठी उपयोगात आणण्यासाठी मुंब्रा येथील हसीना या दलाल महिलेने गळ घातली. त्यानंतर तिने या कामासाठी आपला फ्लॅट काही ठराविक कमिशनवर भाडयाने दिल्याची बाब तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.