जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:39 AM2024-10-22T06:39:45+5:302024-10-22T06:40:21+5:30
गेल्या काही वर्षांपासून आ. किसन कथोरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात राजकीय वाद
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर: माजी खा. कपिल पाटील, शिंदेसेनेचे नेते वामन म्हात्रे तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार अशा विरोधकांनी चोहोबाजूने घेरले असतानाही जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना भाजपने पुन्हा पहिल्या यादीत संधी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून आ. किसन कथोरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील यांना बसला. मुरबाड मतदारसंघात पाटील यांना आघाडी मिळालेली असताना त्यांनी कथोरे यांना टार्गेट केले. काही महिन्यांपूर्वी बदलापूरचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्या विरोधात सुभाष पवार यांना पुढे केले. कथोरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर आता सुभाष पवार यांनी महाविकास आघाडीतून कथोरे यांच्या विरोधात रिंगणात उडी मारावी याकरिता त्यांच्या विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.