डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एक शहर; नगरविकासची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:39 AM2019-07-23T01:39:17+5:302019-07-23T01:39:23+5:30

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे.

Another city on the threshold of Dombivli; | डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एक शहर; नगरविकासची परवानगी

डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एक शहर; नगरविकासची परवानगी

Next

नारायण जाधव 

ठाणे : वाहतूककोंडीसह पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या डोंबिवलीच्या उंबरठ्यावर आणखी एका टाउनशिपला शासनाने १२ जुलै २०१९ रोजी मंजुरी दिली आहे. कल्याण-शीळफाटा मार्गावर हे नवे शहर सुमारे १३३ एकरावर उभे राहणार आहे. याच भागात सध्या पलावा सिटी उभारण्यात आली असून याच सिटीच्या पुढे ही नवी सिटी घारीवली, उसरघर, सागांव येथील जमिनीवर उभी राहणार आहे. निवासी इमारती, वाणिज्यिक संकुले असलेली ही एकात्मिक नगर वसाहत असेल. या नव्या शहरात वास्तव्याला येणाऱ्यांच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी सरकारने बिल्डरवर सोपवली आहे.

काही अटी, शर्तींवर नगरविकास विभागाने या एकात्मिक नगर वसाहतीस परवानगी दिली आहे. कल्याण-अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या अधिसूचित क्षेत्रासाठी विकास आराखड्यातील तरतुदीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे. कल्याण-शीळ या मार्गावरच ही वसाहत उभी राहणार आहे.

सध्या या मार्गावर अनेक छोट्यामोठ्या वसाहतींसह लोढा समूहाची पलावा सिटी उभी आहे. डोंबिवलीचे विस्तारीत क्षेत्र याच मार्गावर आहे. शिवाय नवी मुंबई-ठाणे-पनवेल या महापालिकांना संपर्क साधणारा कल्याण-शीळफाटा हा रस्ता जुन्या मुंबई -पुणे महामार्गाद्वारे सांधणारा एकमेव दुवा आहे. या मार्गांवरून सध्या जेएनपीटीसह तळोजा आणि नवी मुंबईची टीटीसी औद्योगिक वसाहतीतून दररोज बाहेर पडणाºया कंटेनर, अवजडवाहनांसह कामगारांची ने-आण करणाºया बस, टॅक्सी, कारसह केडीएमटी, एनएमएमटीच्या बस याच मार्गावर धावतात. परिणामी या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होती. त्यामुळे या मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच आता मोठ्या समूहाची टाऊनशिप उभी राहणार असल्याने येथील जागांचे भाव वाढणार आहेत.

समस्यांत पडणार भर
शीळफाटा परिसरात सध्या वेगाने लोकसंख्या वाढत असून या परिसरात वाहतूककोंडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. त्यात नव्या वसाहतींमुळे भर पडणार आहे. सध्या शीळफाटा येथे पिक अवरला लोकांना दीड ते दोन तास कोंडीत अडकावे लागते. नवी टाऊनशीप उभी राहिल्यावर या भागात किती वाहतूककोंडी होईल, याची कल्पनाच न केलेली बरी, अशी चर्चा आहे.

या अटींंवर दिली परवानगी
नव्या एकात्मिक वसाहतीस परवानगी देतांना शासनाने अनेक अटी घातल्या आहेत. यात संबधित बिल्डरने केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या स्वत:च घ्यायच्या आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची मोजणी करायची आहे. परिसरातील इतर भूखंडधारकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यांच्यासाठी ९ ते १८ मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा आहे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग, सौर उर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, त्याचा पुनर्वापर करणे यासह वसाहतीत राहायला येणाºया रहिवासी, वाणिज्यिक संकुलांसाठी पाणी आणि विजेची सोय स्वखर्चाने करायची आहे.

Web Title: Another city on the threshold of Dombivli;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.