ठामपाच्या सहाय्यक आयुक्तांची फेरीवाल्यांविरुद्ध आणखी एक तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:30 PM2020-11-08T23:30:57+5:302020-11-08T23:36:57+5:30
रस्त्यावर पथ्यारे मांडून अतिक्रमण करणाऱ्यांचा माल जप्त केल्यानंतर तो गोदामात ठेवणाºया कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण करीत हुज्जत घातल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी रविवारी रात्री वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे आधी घोंगे यांना धमकी देणाºया फेरीवाल्यानेच पुन्हा त्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केल्यानंतर नौपाडा येथील फेरीवाल्यांविरुद्ध ठाणे महापालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी रविवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
दोनच दिवसांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात घोंगे यांनी कारवाईमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी तसेच दबाव आणल्याप्रकरणी विनायक राऊत याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असतांनाच ८ नोव्हेंबर रोजी नौपाडा येथील काही फेरीवाल्यांविरद्ध त्यांच्या पथकाने कारवाई केली. फेरीवाल्यांचे सामान जप्त करुन ते लोकमान्यनगर प्रभाग समितीच्या कार्यालयातील गोदामात ठेवले जात असतांनाच महापालिका कर्मचाºयांना विनायक राऊत याच्यासह दोघा फेरीवाल्यांनी पाठलाग करुन अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे आलेल्या घोंगे यांच्याशी त्यांनी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास वादावादी केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. नौपाडा परिसरातील रस्त्यांवर गर्दी होऊ नये यासाठी पालिकेकडून नेहमीप्रमाणे रविवारी कारवाई सुरु होती. जप्त केलेला हा माल लोकमान्यनगर येथील कार्यालयात ठेवतांना आधी धमकी देणाºया राऊत याच्यासह दोघांनी पुन्हा अडथळा निर्माण केल्याचे घोंगे यांनी सांगितले.