कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं वरसावे नाक्यावरील आणखी एक हॉटेल पालिकेकडून सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 07:32 PM2021-02-25T19:32:09+5:302021-02-25T19:32:54+5:30
मीरा भाईंदर महापालिकेने वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सील केले असताना आता त्याला लागून असलेले फाउंटन हे मोठे हॉटेल देखील पालिकेने सील केले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सील केले असताना आता त्याला लागून असलेले फाउंटन हे मोठे हॉटेल देखील पालिकेने सील केले आहे . फाउंटन मध्ये ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ८ मार्च पर्यंत सदर हॉटेल सील केले आहे .
नेहमीच वर्दळीचा आणि महाराष्ट्रच नव्हे तर अन्य विविध राज्यातील लोकांचा खान - पान व राहण्यासाठी नेहमीच वरसावे नाका , घोडबंदर मार्ग व काशीमीरा महामार्गावरील हॉटेल - बार व लॉज मध्ये राबता असतो . त्यामुळे कोरोना संसर्ग व्यापकपणे पसरण्याचा मोठा धोका ह्या परिसरातील आस्थापनां मधून व्यक्त होत होता .
पालिकेने येथील एक्स्प्रेस इन हॉटेल मध्ये सुरवातीला २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे एंटीजन चाचणीत आढळून आले होते . त्यामुळे सदर हॉटेल १८ फेब्रुवारी पासून ४ मार्च पर्यंत सील केले गेले . तर आरटीपीसीआर चाचणी अहवालात देखील एक्स्प्रेस इन मधील आणखी ८ कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .
महापालिकेने या भागातील हॉटेल आदी आस्थापनां मधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आता एक्स्प्रेस इन लगतच असलेल्या फाउंटन हॉटेल मधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आल्याने महापालिकेने सदर हॉटेल देखील ८ मार्च पर्यंत सील केले आहे असे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी सांगितले .