ठाण्यात आणखी एका माकडाचा पाण्यात बुडून मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Published: February 10, 2023 07:32 PM2023-02-10T19:32:51+5:302023-02-10T19:33:10+5:30
ठाण्यात आणखी एका माकडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
ठाणे : शिवाईनगरातील एका घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडून अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या माकडाच्या पिलाचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. या माकडाचा मृतदेह घेण्यासाठी अग्निशमन दल आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखलही झाले. परंतु, इतर माकडांच्या टोळीने वनविभाग किंवा अग्निशमन दलाला जवळ येऊ न देता, आपल्या या मृत साथीदाराला घेऊन जंगलात पलायन केले.
बुधवारी सावरकरनगर जवळील महात्मा फुले नगर भागात वीजेच्या धक्क्याने एका माकडाचा मृत्यू झाला होता. या घटनेला ४८ तास पूर्ण होत नाही तोच शुक्रवारी आता पुन्हा या दुसºया माकडाचाही अंत झाल्याने प्राणी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शिवाईनगरातील म्हाडा वसाहतीमधील एका बंगल्यावर असलेल्या अपूर्ण भरलेल्या लहान पाण्याच्या टाकीत पडून या माकडाचा मृत्यू झाला. ही बाब तेथील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभाशी संपर्क साधला. घटनास्थळी १.३० वाजण्याच्या ेसुमारास दाखल झालेल्या अग्निशमन आणि वनविभागाच्या कर्मचाºयांना या टाकीजवळ असलेल्या अन्य माकडांच्या टोळक्यांनी जवळ येऊ दिले नाही. याच टोळक्याने प्रयत्न करुन या टाकीतून मृत पिलाला बाहेर काढले. त्यांनी तसेच आधी जवळच्या एका झाडावर नेले. त्यानंतर त्यांनी तसाच येऊरच्या दिशेने प्रवास करीत जंगलात नेल्याची माहिती ठाणे वन विभागाचे वनपाल अशोक काटसकर यांनी दिली. या मृत माकडाचा शोध घेण्यात येत असून तो मिळाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
पाणी पिण्यासाठी शिवाईनगरातील एका बंगल्यावरील पाण्याच्या लहान टाकीत हे माकडाचे पिलू उतरले. त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तो माकडांच्या टोळीकडून मिळविण्यासाठी दोन तास प्रयत्न केले. पण तो मिळाला नाही. त्याचा शोध घेण्यात येत आहे. - अशोक काटसकर, वनपाल, ठाणे.